३ ते ४ दिवस मुसळधार पाऊस, विदर्भासह कोकणाला येलो अलर्ट; पेरणीबाबत शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला

0

पुणे :

राज्यात मान्सून दाखल होऊन बरेच दिवस झाले. पण अद्याप राज्यातील अनेक जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. अशामध्ये हवामान खात्याकडून महत्वाची बातमी समोर आली आहे. पुढच्या तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यासोबतच हवामान खात्याने पेरणीबाबत शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला दिला आहे.

पुणे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘राज्यात पुढचे तीन ते चार दिवस विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडतोय. मात्र मान्सून पूर्णपणे राज्यात सर्व दूर दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभाग आणि कृषी विभागाचा सल्ला घेऊनच पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान तज्ज्ञ एस के होसाळीकर यांनी सांगितले की, ‘राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडतोय. हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे. तरीही मान्सून सर्वदूर महाराष्ट्रात अजून पोहोचला नाही.’

दरम्यान, मान्सूनच्या प्रवासात १० दिवसांचा खंड पडला आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पाऊस पडत नाहीये. अशामध्ये कोकणामध्ये २१ जूननंतर चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये २४ जूननंतर चांगल्या पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. दरम्यान, राज्यातील शेतकरी देखील चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. अशामध्ये चांगला पाऊस पडत नसल्यामुळे राज्यातील अनेक शहरांवर पाणी टंचाईचे संकट आहे. पाऊस न झाल्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात घट होत चालली आहे

See also  मुद्रांक शुल्क आता बिल्डर ला भरावे लागणार !