आषाढी वारीनिमित्त जिल्हाधिकारी यांचा आळंदी पाहणी दौरा !

0

पुणे :

आषाढी वारीनिमित्त जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ व प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत आळंदी येथील दर्शनबारी जागा,भक्तीसोपान पुल,स्कायवॉक,नदी पात्रातील जलपर्णी, प्रदक्षिणा मार्ग यांची पाहणी करून सर्व प्रशासकीय यंत्रणा योग्य ते दिशानिर्देश दिल्याची माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

सदर पाहणी दरम्यान मंदिर समिती विश्वस्त तथा पालखी सोहळा प्रमुख व डी. डी. भोसले-पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना विविध मागण्या केल्या. त्यांना अनुसरून जिल्हाधिकारी यांनी दरवर्षीप्रमाणे दर्शन बारीची जागा वारी कालावधीत प्रशासनाच्या ताब्यात घेण्याचे आदेश लवकरात लवकर निर्गमित करण्याच्या सूचना हवेली प्रांताधिकारी यांना केल्या. तसेच भक्ती सोपान पुलाची डागडुजी करण्यासाठी आवश्यक निधी मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या.

त्याचप्रमाणे इंद्रायणी नदी पात्रातील जलपर्णी काढणे बाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांचे सहकार्य घेतले जाईल. तसेच येत्या काळात जलपर्णी नियमितपने काढता यावी म्हणून आळंदी नगरपरिषदेस जेसीबी,पोकलेन मशीन खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

सुरक्षित वारी,हरित वारी”* या संकल्पनेवर आधारीत यावर्षीची वारी असावी आणि राज्यभरातून वारीसाठी येणाऱ्या भाविकांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणानी आपापसांत समन्वय ठेवून कामकाज करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी यांच्या पाहणी दौऱ्यावेळी पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ,डी.डी. भोसले-पाटील,जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर,हवेली प्रांत आसवले,आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे,खेड तहसीलदार प्रशांत बेडसे,आळंदी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमा नरके, आळंदी नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

See also  लसीबाबत जागतिक निविदा (टेंडर) काढूनही लस मिळण्याची शक्यता कमी : आयुक्त राजेश पाटील