पुणे जिल्ह्यात आणि पुणे महापालिका क्षेत्रात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात

0

औंध :

राज्यात पहिला कोरोनाचा रुग्ण पुण्यात आढळला. पण कोरोनाला थोपविण्याकरता याच पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटने कोविशिल्ड ही लस तयार करुन कोरोनापासून देशाला दिलासा दिला.अखेरीस देशात आणि राज्यात लसीकरणाला सुरूवात झाली असून पुण्यातही लसीकरणाला सुरवात झाली .

पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय, औंध येथे करण्यात आला. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेच्या पहिल्या लाभार्थी वैशाली कर्डिले यांना लस देऊन मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

जिल्हा रुग्णालय, औंध या लसीकरण केंद्रात आयोजित या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, लसीकरण मोहिमेचे समन्वयक डॉ. नितीन बिलोलीकर, कोविड-१९ चे मुख्य फिजिशियन डॉ. किरण खलाटे, अधिसेविका श्रीमती जाधवर तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोविन पोर्टलवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आज लस देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ३१ केंद्रांवर लसीकरण सुरु झाले आहे. केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार प्रत्येक सत्रात १०० लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात आज सायंकाळपर्यंत ३१ केंद्रांवर ३१०० जणांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येत आहे.

तसेच पुणे महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ , विभागीय आयुक्त सौरभ राव ,पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार उपस्थित होते. पुणे जिल्ह्यासह दोन्ही शहरात 31 केंद्रावर पहिल्या टप्प्यात कोरोना योध्दांना लस दिली जात आहे. पुणे शहरात 55 हजार महापालिका कर्मचाऱ्यांनी नोंद केली असून 22 हजार कर्मचाऱ्यांना आज लस शहरातील आठ केंद्रावर दिली जाणार आहे.

See also  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पत्रकार दिनानिमित्त सन्मान सोहळा संपन्न