बँक फोडून 51 लाखांची रोकड पळवणाऱ्या चोरट्यांना वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0

वाकड :

माळशिरस येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक फोडून 51 लाख 16 हजार रुपयांची रोकड घेऊन पळालेल्या चोरट्यांना वाकड पोलिसांनी पिंपरी मधून अटक केली. बँक फोडून पळालेल्या चोरट्यांना बारा तासाच्या आत अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रोकड जप्त करण्यात आली आहे.

फैसल इब्राहीम शेख (वय 29, रा. पिंपळे गुरव. मूळ रा. ठाणे), शाहरुख सत्तार पटवारी (वय 28, रा. औंध. मूळ रा. लातूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मंगळवारी (दि. 18) पहाटे माळशिरस येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा सदाशिवनगर येथे तीन चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने बँकेच्या स्ट्रॉंगरुम मधून 51 लाख 16 हजार 477 रुपयांची रोकड चोरून नेली. तसेच चोरट्यांनी बँकेच्या लॉकर रूममधील सहा लॉकर गॅस कटरने फोडले.

चोरी केल्यानंतर आरोपी चोरीचे साहित्य बँकेतच फेकून पैसे घेऊन पळून गेले. हा प्रकार मंगळवारी सकाळी पावणे दहा वाजता उघडकीस आला. याप्रकरणी बँकेचे शाखा अधिकारी भारत लोंढे यांनी माळशिरस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

मंगळवारी सायंकाळी वाकड पोलीस गस्त घालत असताना सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना माहिती मिळाली की, माळशिरस येथे बँक फोडून पळालेले आरोपी पिंपरी येथे येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी मोहननगर कडून मोरवाडी कोर्टाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लाऊन एक संशयित कार (एमएच 14/एचक्यू 9781) पकडली.

कारमधून दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी माळशिरस येथे बँक फोडल्याचे सांगितले. कारची झडती घेतली असता त्यामध्ये पोलिसांना चार लाख 10 हजार रुपये रोख रक्कम आढळली. दोन्ही आरोपींना सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फौजदार बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदू गिरे, संदीप गवारी, अतिश जाधव, प्रमोद कदम, प्रशांत गिलबिले, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्नील लोखंडे, सौदागर लामतुरे, विनायक घारगे, रमेश खेडकर, सागर पंडित यांनी केली.

See also  12 ऑगस्टला होणार पुण्याच्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण : चंद्रकांत पाटील