पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित

0

४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड; चाकण एमआयडीसीसह ३.५५ लाखांवर वीजग्राहक अंधारात.

पुणे :

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरूवारी (दि. १८) रात्री ७.१० वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला. परिणामी चाकण एमआयडीसीसह पुणे शहरातील नगररोड विभाग आणि पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी व भोसरी विभागातील सुमारे ३ लाख ५५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. रात्री १०.३० नंतर या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरु होण्याची शक्यता आहे.

याबाबत माहिती अशी की, पीजीसीआयएल शिक्रापूर ते पीजीसीआयएल तळेगाव अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिन्यांच्या चारपैकी दोन वाहिन्यांमध्ये आज रात्री ७.१० वाजता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही चाकण, २२० केव्ही चिंचवड, २२० केव्ही उर्से, २२० केव्ही चाकण, १३२ केव्ही चाकण, १३२ केव्ही खराडी या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद झाला. यात सुमारे ३९६ मेगावॅट विजेचा पुरवठा बंद झाल्यामुळे पुणे शहरातील प्रामुख्याने खराडी, वडगाव शेरी, विमाननगर, येरवडा, धानोरी आदी परिसरातील सुमारे १ लाख २५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. सोबतच पिंपरी गाव, चिंचवड, पुनावळे, वाल्हेकरवाडी, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव परिसर आणि संपूर्ण प्राधीकरणासह आकुर्डीमधील ५० टक्के परिसरातील २ लाख ३० हजार असे एकूण ३ लाख ५५ हजारांवर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. यासोबतच चाकण एमआयडीसीमधील उच्च व लघुदाहबाच्या सुमारे ५ हजार औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. तर १३२ केव्ही अतिउच्चदाब चाकण उपकेंद्रातून एका वीजवाहिनीद्वारे चाकण शहराचा वीजपुरवठा सुरु ठेवण्यात आला आहे.

_’ORTHOS’ *orthopaedic & spine superspeciality centre in Baner.._*

या पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिन्यांच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी असलेल्या अदानी कंपनीकडून बिघाड दुरुस्त करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून रात्री १०.३० च्या सुमारास महापारेषणच्या सर्व अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महावितरणच्या उपकेंद्रांचा टप्प्याट्प्पयाने वीजपुरवठा सुरु करण्यात येईल. त्यामुळे या सर्व भागातील खंडित वीजपुरवठा रात्री १०.३० ते ११.३० च्या सुमारास सुरळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे काही भागात वीजपुरवठा सुरू झाला.

See also  जिल्ह्या परिषदेच्या निवडणुकीत पाच विद्यमान आणि माजी आमदारांचे पुत्र उतरणार

परंतू परत 12.45 दरम्यान बऱ्याच ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरीकांना प्रचंड उकाडा सहन करत त्रास सोसावा लागला.