भारताला 2027 पर्यत कार्बन न्यूट्रल देश करण्यासाठी प्रयत्न सुरू : नितीन गडकरी

0

नागपूर :

भारताला 2027 पर्यत कार्बन न्यूट्रल देश करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी नागपुरात दिली.

स्थानिक हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे आयोजित सी-20 परिषदेच्या समारोप समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यात्मिक गुरू माता अमृतानंदमयी होत्या. तसेच विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या उपाध्यक्ष निवेदिता भिडे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, स्वागत समितीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी गडकरी म्हणाले की, कार्बन डायऑक्साईडचे वातावरणात उत्सर्जन होण्याचे प्रमाण आणि वातावरणातून कार्बन डायऑक्साईड काढून टाकण्याचे प्रमाण यांचे योग्य संतुलन साधून निव्वळ शून्य कार्बनभार साध्य करण्याचे उद्दिष्ठ 2027 पर्यत साध्य करायचे आहे. भारताने त्या दिशेने वाटचाल सुरू केली असून ग्रीन हायड्रोजनसह इथेनॉल, वीजेवर चालणाऱ्या गाड्या आदी पर्यायी इंधनाचा वापर सुरू केला आहे. विविध उपाययोजना करून कार्बन डायऑक्साईड आणि इतर ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी ऊर्जा स्रोत आणि उद्योग प्रक्रिया यांमध्ये बदल करण्यात येत आहे. रस्ते बांधकामात आम्ही महापालिकेच्या कचऱ्याचा उपयोग करीत आहो. बांबूपासून बायो इथेनॉल तयार करीत आहो. हायड्रोजन आणि ऑक्सिजन पाण्यापासून वेगळे करून ग्रीन हायड्रोजन तयार करीत आहो. शेतकरी अन्नदाता आहेच. पण त्याने उर्जा दाता आणि डांबर निर्माताही व्हावे. भारत ही वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था आहे. जम्मू आणि काश्मिरात लिथियमचे साठे सापडल्याचे गडकरींनी सांगितले.

यावेळी निवेदिता भिडे म्हणाल्या की, भारत अध्यात्मिकतेसाठी ओळखला जातो असे सांगितले. एकात्मभावनेने काम करताना आम्ही काही मूल्ये रूजवली आहेत असे सांगितले. जगताना आमचा दृष्टीकोन दीर्घकालीन आहे. इतरांबद्दल राग, द्वेष, मत्सर बाळगणे हा शॉर्टकट झाला. आमच्या ध्येयाचे व्यावसायिकीकरण करणे आम्हाला मान्य नाही. अलिकडे युवक युवतींमध्ये लिंगबदल करण्याचे प्रकार होत आहे. हे व्यावसायिकीकरण चुकीचे आहे. प्रत्येक समाजाची गरज वेगळी असते. आर्थिक विकासाची एकच पद्धत जगभरात लागू होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

See also  नारायण राणे यांना जामीन मंजूर.