नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला अखेर मान्यता…

0

नाशिक :

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला अखेर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली आहे. मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच नाशिक-पुणे रेल्वे प्रवास जलद आणि सुखकर होणार आहे

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

नाशिक-पुणे या रेल्वेमार्गाला मंजूरी मिळावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय पातळीवर लोकप्रतिनिधींचे प्रयत्न होते. रेल्वे मंत्रालयाने आता हा हायस्पीड रेल्वे प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला असून, या प्रकल्पासाठी आवश्यक 1 हजार 450 हेक्टरपैकी 30 हेक्टरपेक्षा अधिक खासगी जागा संपादन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एमआरआयडीसीएल) देण्यात आली.

सध्या नाशिक-पुणे असा थेट रेल्वे मार्ग नसल्याने पुणे किंवा नाशिक गाठण्यासाठी मुंबईला येऊन रेल्वे पकडावी लागते. त्यामुळे प्रवासासाठी सहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. प्रवास वेळ कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हायस्पीड रेल्वे संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा रेल्वे मार्ग पुणे – अहमदनगर – नाशिक या तीन जिल्ह्यांना जोडणारा असल्याने या तिन्ही जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. तसेच शेतकर्‍यांना शेतमालाची ने-आण करण्याची मोठी सुविधा देखील यामुळे निर्माण होणार आहे.

असा असणार रेल्वे प्रकल्प…

– 16 हजार कोटी रुपयांचा खर्च

– 235 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग

– पुणे – अहमदनगर – नाशिक जिल्ह्यांना जोडणार

– 200 किलोमीटर प्रतितास वेग

– पुणे ते नाशिक अंतर पावणेदोन तासात कापता येणार

See also  बुधवारी रात्री आठपासून राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू होणार ?