योगीराज पतसंस्थेच्या वतीने सभासदांना 12% लाभांश जाहीर …

0

बाणेर :

योगीराज पतसंस्थेच्या 27 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना12% लाभांश जाहीर करण्यात आला. याप्रसंगी कु.श्रावणी गोगुलवार या मुलीला12 वीच्या परीक्षेत 99.40% गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल तसेच कु. सावरी शिंदेने केरळ येथे झालेल्या वेट लिफ्टिंग स्पर्धेत 4 सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल संस्थेच्या वतीने प्रत्येकी 11 हजार रुपयांचे बक्षीस देवून माजी महापौर मुरलीधर मोहोळ व यशदाचे माहिती व प्रकाशन विभाग प्रमुख डॉ. बबनराव जोगदंड यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. तसेच दहावीच्या परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळालेल्या गरीब 13 विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात आली, अहवाल वर्षात विक्रमी दैनंदिन कलेक्शन संकलन केलेल्या 5 प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला, कु. संगीता जगताप या गरीब कुटुंबातील मुलीला योगीराज कन्यारत्न विवाह मदत योजने अंतर्गत संपूर्ण भांड्यांचा संसार भेट देण्यात आला.

तसेच याप्रसंगी मा. महापौर मुरलीधर मोहोळ यांची भाजपा च्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल व मा. नगरसेवक विकास दांगट यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल, तसेच पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अँड.पांडुरंग थोरवे यांचा संस्थेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

श्रीराम समर्थ पतसंस्थेने प्रकाशित केलेल्या लेखक डॉ.प्रफुल्ल चौधरी यांच्या मानसिक आरोग्य व ध्यान साधना या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करून आलेल्या 500 सभासदांना पुस्तके वाटण्यात आली.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, संस्थेला यावर्षी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचा राज्यातील आदर्श पतसंस्था पुरस्कार मिळाला आहे. संस्थेच्या 103 कोटी रुपयांच्या ठेवी झाल्या असून 2 कोटी 60 लाख रुपयांचा नफा झालेला आहे. यावर्षी 12% लाभांश वितरीत करणार आहोत. इतर संस्थांच्या तुलनेत हा लाभांश भरघोस आहे.  संस्थेने केलेल्या सामाजिक उपक्रमांचा लेखाजोखा यावेळी त्यांनी सांगितला व कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक अनुदान, मेडिक्लेम पॉलिसि  आशा अनेक विवीध सुविधांचा उल्लेख केला.

See also  बाणेर नागरी पतसंस्थेच्या वतीने आजी-माजी संचालकांचा वाढदिवसानिमित्त सन्मान. 

मा. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, संस्था करीत असलेले आर्थिक जोखमीचे काम व त्यासोबत केलेले सामाजिक कार्य खरोखर इतर संस्थांना प्रेरणा देणारे आहे. विद्यार्थी असोत किंवा खेळाडूंच्या पाठीवर संस्था देत असलेली कौतुकाची थाप ही त्या मुलांची प्रेरणा ठरते. संस्था अशीच उत्तरोत्तर नक्कीच प्रगती करत राहील असेही यावेळी त्यांनी सांगितले.

डॉ. बबनराव जोगदंड यांनी सांगितले की, योगीराज पतसंस्था ही अतिशय उत्कृष्ट काम करत आहे, त्यामुळे आम्ही त्यांना दुबई येथे पुरस्कार देणार असल्याचे यावेळी जाहीर केले. संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात शाखा उघडल्या पाहिजेत व करत असलेले चांगले काम राज्यभर करावे असेही सांगितले.

याप्रसंगी मा. नगरसेवक अमोल बालवडकर, सनी निम्हण, कैलास गायकवाड, दिलीप वेडेपाटील, मा. नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, निवृत्त पोलीस अधिकारी अजय कदम, पुणे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त विजय दहिभाते,मा. पंचायत समिती सदस्य अशोक मुरकुटे, गुडविल इंडिया चे कालिदास मोरे, मा.सरपंच शामराव हुलावळे, नारायण चांदेरे, हॉटेल उद्योजक रामदास मुरकुटे, सदानंद शेट्टी, पतसंस्था फेडरेशन चे सचिव शहाजी रानवडे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त दिलीप फलटणकर, युवा नेते भाजपा चे प्रकाश तात्या बालवडकर, गणेश कळमकर, लहू बालवडकर, नितीन रणवरे, जीवन चाकणकर, अनिकेत मुरकुटे, जयेश मुरकुटे, डॉ. राजेश देशपांडे, विशाल तुपे, मा. सरपंच अंकुश बालवडकर, गोसेवक संजय बालवडकर, गोविंद रणपिसे, नानासाहेब ससार, श्रीराम समर्थ पतसंस्थेचे संस्थापक दत्तात्रय तापकीर, डॉ. रमेश वझरकर, संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते ,शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे व दोन्ही शाखांचे सर्व संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.

आलेल्या सर्वांचे स्वागत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त संस्थेचे तज्ञ संचालक भानुप्रताप बर्गे यांनी केले तर आलेल्या सर्वांचे आभार शाखाध्यक्ष शंकराव सायकर यांनी मानले.