सणासुदीच्या काळात कंत्राटी एसटी कामगारांना काढून टाकण्याची वेळ..

0

मुंबई :

वेतनवाढीचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने महामंडळाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची नोकरीवरून कपात केली आहे. बेरोजगारांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ऐन सणासुदीच्या काळात कंत्राटी एसटी कामगारांना काढून टाकण्याची वेळ आली आहे.

शनिवारपासून कंत्राटी चालकांची सेवा बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यासाठी महामंडळाने चालकांचा वापर कमी होत असल्याचे कारण दिले आहे. मागील दोन वर्षात एसटीची सेवा कोरोनाच्या प्रसारामुळे पूर्णतः बंद होती. यावेळी मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे एसटीला सरकारने आदेश दिले होते. याच काळात खासगी संस्थांना कंत्राटी चालक नियुक्तीचे आदेश एसटी महामंडळाने दिले होते. नंतरच्या काळात एसटी संघटनांचा संप सुरू झाला. त्यामुळे पुन्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली.

एसटी कर्मचाऱ्यांचा कायमस्वरूपी २७ ऑक्टोबर २०२१ पासून आंदोलन सुरू होते. या काळात प्रवासी वाहतूक सुरळीत होण्यासाठी महामंडळाने कंत्राटी तत्वावर एसटी चालकांची भरती करण्यात आली होती. एप्रिल २०२२ मध्ये आंदोलन मागे घेऊन, कर्मचारी एसटी सेवेत पुन्हा हळूहळू रुजू होऊ लागले. मात्र कंत्राटी कामगारांना त्यावेळी मुदत वाढवून देण्यात आली होती.

राज्यभरासाठी एकच कंत्राटदार नेमण्याचा प्रयत्न असणार आहे. यामध्ये सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त नवीन कंत्राटी चालकांची भरती केली जाणार आहे. पूर्वी राज्यभरात तब्बल २१७६ कंत्राटी चालकांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, कंत्राट घेऊनही कर्मचाऱ्यांची पूर्तता केली नसल्याने अखेर संबंधित कंत्राट रद्द करून कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. येत्या काळात एसटी प्रशासनाकडून भरतीसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे.

वेतनवाढीचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र संपतील कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू झाल्यावर कंत्राटी कामगारांना काम थांबवावे लागेल, अशी पूर्व कल्पना कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

See also  सारथी संस्थेस मिळणार नवी मुंबईतील खारघर येथील भुखंड...