पुणे शहरातील सहा विस्तारीत एलिव्हेटेड मेट्रो मार्गांचे सुमारे ४५ किलोमीटरचे प्रकल्प अहवाल महामेट्रोने केले सादर

0

पुणे :

पुणे शहरातील सहा विस्तारीत एलिव्हेटेड मेट्रो मार्गांचे सुमारे ४५ किलोमीटरचे प्रकल्प अहवाल महामेट्रोने महापालिकेला नुकतेच सादर केले आहेत.

स्वारगेट – हडपसर मार्गाच्याही अहवालाचा त्यात समावेश आहे. या मार्गांसाठी सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच शहरातील उच्च क्षमता द्रुतगती बाह्यवर्तुळाकार मार्गाचा (एचसीएमटीआर) प्रकल्प अहवाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस महापालिकेला सादर होणार आहे. यामुळे शहरातील मेट्रोचे जाळे विस्तारीत होण्यासाठीचे पहिले पाऊल पडले आहे.

स्वारगेट- हडपसर मार्गासाठी ‘पीएमआरडीए’नेही प्रकल्प अहवाल तयार करून राज्य सरकारला सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर महामेट्रोनेही या मार्गाचा प्रकल्प अहवाल महापालिकेला सादर केला आहे. स्वारगेट – हडपसर मेट्रो मार्गासाठी कोणता प्रकल्प अहवाल अंतिम करायचा, याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

पीएमआरडीए आणि महामेट्रोचे मेट्रो तंत्रज्ञान वेगवेगळे आहे. स्वारगेट – हडपसर मेट्रो पुढे खराडी, वाघोलीला जोडण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे या बाबतचा अंतिम निर्णय आणि अन्य प्रकल्पांवर अंतिम निर्णय राज्य सरकार घेईल. त्यानंतर केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर काम सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, महासंचालक हेमंत सोनवणे उपस्थित होते.

See also  पाषाण रोड वरील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमी नागरिकांचा विरोध...!