सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळाल्यानंतर अरुणकुमार सिंग शरण, कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीनाच्या रक्त नमुन्यात बदल

0

पुणे :

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अरुणकुमार सिंग हा बुधवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात शरण आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सिंग याचा जामीन फेटाळाला होता. त्यानंतर तो न्यायालयात शरण आला.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात बदल करण्यात आला होता. त्याच्यबरोबर असलेल्या दोन मित्रांच्या रक्ताच्या नमुन्यात बदल करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले होते. याप्रकरणात विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी आणि साथीदारांनी ससूनच्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीहरी हाळनोर, न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डाॅ. अजय तावरे यांना लाच दिल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणातील एका आरोपीने मुलाच्या रक्ताऐवजी स्वत:च्या रक्ताचा नमुना दिला. आरोपी आशिष याने अरुणकुमार सिंग याच्या सांगण्यावरून स्वतःचे रक्त दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले होते.या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंग याने पुणे जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज २३ ऑक्टोबर रोजी फेटाळून लावला. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध सिंग याने सर्वोच्च न्यायालयात दाग मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर सिंग बुधवारी न्यायालयात हजर झाला. न्यायालयाने त्याची रवानी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले.

सिंग याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तपासासाठी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे, असे विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांनी सांगितले.अरुणकुमार सिंग बुधवारी दुपारी न्यायालयात शरण आला. रक्ताचे नमुने बदल प्रकरणात तो सामील असल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या परवानगीने त्याची पोलीस कोठडी मिळविण्यात येणार आहे.

See also  पुण्यातील जंबो कोविड सेंटर बंद होणार ?