आयआयएम सारख्या संस्थेद्वारे शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शास्त्र थेट बांधावर उपलब्ध होणार..

0

पुणे ः

”व्यवस्थापन क्षेत्रातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम)सारख्या संस्थेद्वारे शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शास्त्र थेट बांधावर उपलब्ध होईल.

यामुळे काढणीपश्‍चात होणारे नुकसान टाळून मूल्यवर्धनातून शेतमालाला अधिकचा बाजारभाव मिळेल,” असा विश्‍वास राज्याच्या पणन विभागाचे अपर मुख्य सचिव आणि मॅग्नेट सोसायटीचे अध्यक्ष अनुपकुमार यांनी व्यक्त केला.

नागपूरच्या ‘आयआयएम’ आणि ‘मॅग्नेट सोसायटी’मध्ये शेतीमालाच्या मूल्यवर्धनाबाबतचा ‘सेंटर फॉर एक्सलन्स’बाबतचा सामंज्यस्य करार करण्यात आला. त्यावर शुक्रवारी (ता.१७) सह्या करण्यात आल्या. या वेळी ‘आयआयएम’चे संचालक भीमराया मेत्री, ‘मॅग्नेट’चे प्रकल्प संचालक दीपक शिंदे उपस्थित होते.

अनुपकुमार म्हणाले,”’आयआयएम’सारख्या व्यवस्थापन क्षेत्रातील संस्थेसोबत शेतकऱ्यांसाठी सामंज्यस्य करार होणे ही गौरवाची बाब आहे. या संस्थेत असलेल्या आंतरराष्ट्रीय सुविधांमुळे शेतकऱ्यांना उत्पादन, पीक संरक्षण, काढणीपश्‍चात हाताळणी, बाजारपेठ आदी प्रशिक्षणांचा लाभ होईल. यामधील महिलांच्या सहभागामुळे मूल्यसाखळी विकसित होऊन महिला सशक्तीकरणास बळ मिळेल.”

मंत्री म्हणाले, ”कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी आम्ही १६ विविध संस्थांसोबत करार केले आहेत. ‘मॅग्नेट’सोबतच्या करारामुळे राज्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञांमार्फत काढणीपश्‍चात हाताळणी आणि उत्तम कृषी सेवांचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याद्वारे दर्जेदार शेतीमाल उत्पादन विक्री आणि मूल्यसाखळीद्वारे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावण्यास मदत होईल.”

शिंदे म्हणाले, ‘मॅग्नेट’अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट, खासगी उद्योजक यांचा संस्थात्मक तांत्रिक आणि विपणनविषयक क्षमतांचा विकास करण्यात येईल. याद्वारे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या व्यवसाय विकास आराखड्याद्वारे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादन घेणे, त्याचे मूल्यवर्धन करणे, नवीन बाजारपेठांचा शोध घेणे आदी प्रशिक्षणे दिली जातील.”

See also  मुंबईत महापौर काँग्रेसचाच असेल : बाळासाहेब थोरात