मुंबई :
राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका आघाडीने एकत्र लढवल्या आणि चांगलं यशही मिळवलं. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हि तिन्ही पक्ष आघाडी म्हणून मुंबईसह राज्यातील इतर महानगरपालिकाही एकत्र लढेल असा अंदाज बांधला जात होता. मात्र, आता आघाडीतील या तिन्ही पक्षांमधून स्वबळाचीही भाषा येऊ लागलीय. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही आगामी मुंबईत महापौर काँग्रेसचाच असेल असं म्हणत दंड थोपटले आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, “काँग्रेस पक्षाच्या आवाजाने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक गाजणार आहे. काँग्रेस यंत्रणेने सर्व ताकद लागली तर मुंबई महापौर होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. सरकार आले, त्यात काही प्रश्न आहेत. काँग्रेस पक्ष श्रेष्ठ आहे. त्याचा सन्मान राखण्यात कधीच तडजोड नाही. अशोक चव्हाण आणि मी हक्काने याबाबत विषय मांडू.”
यावेळी बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. तसेच मुंबईचा महापौर काँग्रेसचा झाला पाहिजे, असं कार्यकर्त्यांना आवाहन केलं.