‘करिअर कट्टा’ स्पर्धेत डॉ.आंबेडकर महाविद्यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिक

0

औंध :

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘करिअर कट्टा’ या राज्यस्तरीय स्पर्धेत, रयत शिक्षण संस्थेच्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. नाशिक येथील सपकाळ नॉलेज हब येथे आयोजित भव्य समारंभात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.उदय सामंत यांच्याहस्ते हे पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे राज्य समन्वयक यशवंत शितोळे, डॉ. रवींद्र सपकाळ हेही या प्रसंगी उपस्थित होते.

‘करिअर कट्टा’ अंतर्गत “IAS आपल्या भेटीला”, “उद्योजक आपल्या भेटीला” आणि “संविधानाचे पारायण” या वर्षातील ३६५ दिवस चालणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हे उपक्रम आपल्या महाविद्यालयात प्रभावीपणे राबविणाऱ्या, आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणाऱ्या महाविद्यालयांना या स्पर्धेअंती पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

राज्यभरातील शेकडो महाविद्यालयांनी सहभाग नोंदविलेल्या या स्पर्धेचे पारितोषिक स्वीकारण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण आंधळे, प्रा.बी.एस. पाटील, प्रा.बद्रीनाथ ढाकणे, महाविद्यालयाचे ‘करिअर कट्टा’ समन्वयक प्रा.कुशल पाखले हे उपस्थित होते.

‘‘राज्य स्थरावर पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये आमच्या महाविद्यालयाला बक्षीस मिळणे खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. रयत शिक्षण संस्थेच्या सातत्यपूर्ण भक्कम पाठिंब्यामुळेच हे सर्व शक्य होऊ शकले आहे.’’ असे मत प्राचार्य डॉ.अरुण आंधळे यांनी यावेळी मांडले आहे.

या सन्मानानंतर महाविद्यालय ‘करिअर कट्टा’ उपक्रमाचे समन्वयक प्रा.कुशल पाखले, यांनी समाधान व्यक्त करताना म्हटले की, ‘‘डॉ.आंबेडकर महाविद्यालय गोर-गरीब विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सतत परिश्रम घेत असते, त्यामुळे आज मिळालेले बक्षीस हे आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचीच पावती आहे.’’

‘करिअर कट्टा’ या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.नंदकिशोर गंगाळे, प्रा.गौरी पवार, प्रा.सायली गोसावी आदींनी परिश्रम घेतलेले आहेत.

या स्पर्धेत राज्यातील अनेक अग्रगण्य महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता, त्यात आमच्या महाविद्यालयाला बक्षीस भेटणे आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. स्पर्धेसाठी मेहनत घेणाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा..! -प्रा.बी.एस. पाटील शारीरिक शिक्षण प्रमुख

See also  खंडणीप्रकरणी नाना वाळके व अनिकेत हजारे यांना पोलिसांनी केली अटक