मुंबई :
जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२२) पंधराव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. सर्व संघांनी आपले खेळाडू रिटेन केले आहेत. तसेच या स्पर्धेत अहमदाबाद व लखनऊ या दोन नव्या संघांना प्रवेश देण्यात आला आहे.
या हंगामासाठी लवकरच मेगा लिलाव पार पडेल. तत्पूर्वी, आयपीएल २०२२ शी निगडीत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
विवोने सोडले आयपीएलचे प्रायोजकत्व
मागील अनेक वर्षांपासून आयपीएलचे मुख्य प्रायोजक असलेली चिनी मोबाईल कंपनी विवोने अचानकपणे आपले प्रायोजकत्व मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी, भारतातील अग्रगण्य व्यवसायिक समूह टाटा आयपीएलचे नवे मुख्य प्रायोजक असतील.
मंगळवारी (११ जानेवारी) आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर आयपीएल धोरणी कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी याबाबत घोषणा केली. विवोचा करार अद्याप संपलेला नव्हता. ते २०२३ पर्यंत आयपीएलचे मुख्य प्रायोजक राहणार होते. मात्र, त्यांनी अचानकपणे माघार घेतल्याने आता आयपीएल ‘टाटा आयपीएल’ या नावाने ओळखली जाईल. टाटा व बीसीसीआय यांच्यातील या प्रायोजकत्व कराराच्या रकमेबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
पाचवे मुख्य प्रायोजक बनणार टाटा
आयपीएलला आतापर्यंत चार वेगवेगळे मुख्य प्रायोजक लाभले आहेत. भारतातील प्रमुख रियल इस्टेट कंपनी डीएलएफ ही सर्वप्रथम आयपीएलची मुख्य प्रायोजक राहिलेली. त्यांनी २००८ ते २०१२ पर्यंत हे प्रायोजकत्व निभावले होते. त्यानंतर जगप्रसिद्ध शीतपेये कंपनी पेप्सीने २०१३ ते २०१५ पर्यंत स्पर्धेला प्रायोजकत्व दिले.
त्यानंतर, विवो २०१९ पर्यंत स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होते. २०२० मध्ये चीनने भारतीय सीमारेषेवर अतिक्रमण केल्याने २०२० आयपीएलसाठी ड्रीम इलेव्हनने प्रायोजकत्व देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, २०२१ मध्ये विवोने स्पर्धेचे मुख्य प्रायोजक म्हणून पुनरागमन केलेले.