आग लागल्यामुळे दक्षिण आफ्रिकेची नॅशनल असेंब्ली अर्थात संसद जळून खाक

0

केपटाऊन :

आग लागल्यामुळे दक्षिण आफ्रिकेची नॅशनल असेंब्ली अर्थात संसद जळून खाक झाली. आगीत प्रचंड नुकसान झाल्यामुळे इमारतीचा उरलासुरला भाग आग पूर्ण विझवल्यानंतर पाडून टाकावा लागणार आहे.

स्थानिक वेळेनुसार सकाळी सहाच्या सुमारास दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल असेंब्लीला अर्थात संसदेच्या इमारतीला आग लागली. सहा तासांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरी आग पूर्ण विझलेली नाही. अग्नीशमन दल आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. आग लागमुळे संपूर्ण इमारतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सरकारी इमारतींमध्ये आग लागल्यावर फायर अलार्म वाजतात. पण दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल असेंब्लीच्या इमारतीला आग लागल्यावर फायर अलार्म वाजले नाही. आग भडकली आणि इमारतीत वेगाने पसरू लागली त्यावेळी फायर अलार्म वाजला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आग आल्पावधीत पसरली.

अग्नीशमन दलाचे पहिले पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर फायर अलार्म वाजला. आग लागल्याची माहिती दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिर‍िल रामफोसा यांना देण्यात आली. राष्ट्राध्यक्ष घटनास्थळी पोहोचले.

राष्ट्राध्यक्ष सिर‍िल रामफोसा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल असेंब्लीला आग लागल्यानंतर सहा मिनिटांत अग्नीशमन दलाचे पहिले पथक घटनास्थळी पोहोचले. इमारतीमधील फायर अलार्म आणि आग विझवण्याची यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नसल्यामुळे संपूर्ण इमारतीचे नुकसान झाले. इमारतीमधील फायर स्प्रिंकलमधून पाणी आलेच नाही. यामुळे परिस्थिती गंभीर झाल्याचे राष्ट्राध्यक्ष सिर‍िल रामफोसा यांनी सांगितले. आग प्रकरणाची चौकशी केली जाईल; असेही ते म्हणाले.

आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. स्थानिक पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. आग लागल्यामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्या सुरू आहेत. नॅशनल असेंब्लीचे सत्रही नाही. यामुळे इमारतीत माणसं अगदी मर्यादीत संख्येने होती. जे होते त्यांनी आग लागताच तातडीने सुरक्षित ठिकाण गाठले. यामुळे जीवितहानी झालेली नाही.

नॅशनल असेंब्लीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. तिथून आग वेगाने पसरली; अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे. इमारतीत अनेक ठिकाणी लाकडाचे काम केले आहे आणि लाकडी फ्लोरिंग आहे. तसेच इमारतीत अनेक ठिकाणी लांबच लांब गालिचे अंथरले आहेत. आग लागल्यावर या वस्तूंनी लगेच पेट घेतला. आग पसरली आणि संपूर्ण इमारतीचे नुकसान झाले.

See also  वंचित आणि गरिबांना मोफत न्यायदान सेवा देण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याचा विचार केला जावा : उपराष्ट्रपती

दक्षिण आफ्रिकेच्या संसदेची इमारत तीन टप्प्यात बांधण्यात आली. इमारतीचा सर्वात जुना भाग १८८४ मध्ये बांधण्यात आला. नंतर १९२० आणि १९८०च्या दशकांमध्ये इमारतीचे दोन नवे भाग बांधून काढण्यात आले. नॅशनल असेंब्ली नव्या भागात होती. या ठिकाणी लोकांनी थेट निवडून दिलेले ४०० लोकप्रतिनिधी कामकाजात सहभागी होत होते. आग लागल्यामुळे नॅशनल असेंब्ली जळून खाक झाली.