महिलांना तालिबान देत असलेल्या वागणुकीबद्दल आणि अत्याचाराबद्दल जगभर पडसाद

0

काबूल:

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवल्यानंतर सर्वत्र तालिबानच्या अत्याचाराबद्दल चर्चा होते आहे. विशेषत: महिलांना तालिबान देत असलेल्या वागणुकीबद्दल आणि महिलांवर तालिबान करत असलेल्या अत्याचाराबद्दल जगभर पडसाद उमटत आहेत.

अशा परिस्थितीत अफगाणिस्तानातील एका महिलेने प्रचंड धैर्य, हिंमत दाखवत तालिबानविरुद्ध शस्त्र हाती घेत मोठा लढा दिला आहे. सलिमा मझारी ही अफगाणिस्तानची वाघीण आहे. सलिमा मझारी अफगाणिस्तानातील पहिल्या महिला गव्हर्नर्स पैकी एक आहेत. बल्ख प्रांतात सलिमा मझारी यांनी तालिबानविरुद्ध मोठा लढा दिला आहे.

सलिमा मझारी सध्या तालिबानच्या ताब्यात

अमेरिकन फौजांनी अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर अनेक अफगाण राजकीय नेते देशाबाहेर निघून गेले आहेत. मात्र सलिमा मझारी यांनी अफगाणिस्तानात राहण्याचा निर्णय घेतला होता. सलिमा यांच्या बाल्ख प्रांताचा पाडाव तालिबान्यांकडून होईपर्यत आणि त्यांचा चहर किंट हा जिल्हा तालिबानच्या ताब्यात जाईपर्यत त्या संघर्ष करत राहिल्या. या शेवटच्या लढाईनंतर तालिबानने त्यांना ताब्यात घेतले आहे. सध्या सलिमा मझारी यांची स्थिती काय आहे, त्या कुठे आहेत याबद्दल काहीच माहिती समोर आलेली नाही.

तालिबानला झुंज देणारी लढवय्यी

अफगाणिस्तानवर झपाट्याने ताबा मिळवताना तालिबानने एकेक प्रांत आपल्या ताब्यात घेतला. याच मोहिमेत त्यांनी सलिमा मझारी यांनादेखील ताब्यात घेतले. देशाच्या राष्ट्राध्यक्षांसह अनेक नेते अफगाणिस्तानातून पलायन करून गेल्यानंतरदेखील ही वाघीण तालिबानशी संघर्ष करत राहिली होती. काही वर्षांपूर्वी सलिमा मझारी अफगाणिस्तानातील एका प्रांतात गव्हर्नर झाल्या होत्या. अफगाणिस्तानात गव्हर्नर झालेल्या पहिल्या तीन महिलांपैकी त्या एक होत्या. अफगाणिस्तानातील बहुतांश प्रांत कोणताही लढा न देता तालिबानसमोर शरणागती पत्करत असातना सलिमा मझारी यांनी त्यांच्या बाल्ख प्रांतातील चहर किंट या जिल्ह्याला स्वतंत्र ठेवण्यासाठी शेवटपर्यत आणि निकराचे प्रयत्न केले. चाहर किंट जिल्ह्याने सलिमा मझारी यांच्या नेतृत्त्वाखाली तालिबानला अत्यंत कडवी झुंज दिली. सलिमा यांच्या प्रेरणेने त्यांच्या जिल्ह्यातील लोकांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग पेटले होते. हा जिल्हा अतिरेकी विचारसणीच्या तालिबानविरुद्ध पेटून उठला होता.

See also  काँग्रेस अध्यक्षपद राहुल गांधींकडेच ? बैठकीत स्पष्ट संकेत

अफगाणिस्तानात सलिमांबद्दल प्रचंड आदर

मात्र तालिबानच्या प्रचंड ताकदीसमोर सलिमा मझारी आणि त्यांच्या जिल्ह्यातील सहकाऱ्यांची ताकद कमी पडली. तालिबानने चाहर किंटवर कब्जा मिळवला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता तालिबानचा कब्जा होण्याआधी चहर किंट हा अफगाणिस्तानातील एकमेव भाग होता ज्यावर एका महिलेचे नेतृत्व आणि नियंत्रण होते. हा जिल्हा कोणत्याही अतिरेकी संघटनेला ताब्यात घेता आला नव्हता. मागील वर्षी सलिमा मझारी यांनी यशस्वीरित्या वाटाघाटी करत १०० तालिबान्यांना शरणागती पत्करायला लावली होती. मागील काही वर्षात सलिमा मझारी यांनी अफगाणिस्तानात मोठा प्रभाव निर्माण केला होता. अफगाणिस्तानातील महिला नेतृत्व म्हणून सलिमा यांना मोठा आदर आणि प्रसिद्धी मिळाली होती. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेण्याची मोहिम सुरू करण्यापूर्वी काही दिवस आधीच सलिमा यांनी त्यांच्या लोकांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली होती.