डेटिंग ॲपवरून महिलेशी मैत्री करणे एका तरुणाला पडले महागात : वाकड येथील घटना

0

 

पुणे:

डेटिंग ॲपवरून महिलेशी मैत्री करणे एका तरुणाला महागात पडले आहे. महिलेने तरुणाला पुण्यात भेटायला बोलावले. एका हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्याला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याच्याकडील दागिने, रोकड आणि मोबाइल फोन लुटला.

पुण्यातीलल  वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये नुकताच हा धक्कादायक प्रकार घडला. ऑनलाइन डेटिंग ॲपवर चेन्नईतील ३० वर्षीय आशिषकुमारची महिलेसोबत मैत्री झाली. तिने त्याला पुण्याला भेटायला बोलावले. त्यानंतर एका हॉटेलमध्ये ते दोघे गेले. तेथे शीतपेयात गुंगीचे औषध मिसळले आणि त्याला बेशुद्ध केले. त्याच्याकडील सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाइल फोन असा एकूण दीड लाखांचा ऐवज लुटला.

आशिषकुमार याने या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिषकुमार आणि त्या महिलेची डेटिंग ॲपवर ओळख झाली होती. दोघे जण एकमेकांशी दररोज चॅटिंग करत होते. कामाची गरज असल्याचे सांगत महिलेने त्याला पुण्याला बोलावून घेतले.

दोघांनी पुणे-मुंबई महामार्गावरील एका हॉटेलमध्ये खोली घेतली. १८ जानेवारीला पहाटे पाचच्या सुमारास महिलेने आशिषकुमार याला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले आणि त्याच्या अंगावरील सोन्याची चेन, अंगठी, मोबाइल फोन आणि १५ हजार रुपये असा दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेनंतर शुद्धीवर आलेल्या आशिषकुमार याने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.

See also  कोरेगाव भीमा प्रकरणी दोषींवर कारवाई करणार : गृहमंत्री