मृतांच्या नातेवाईकांना सीरम इन्स्टिट्यूटकडून प्रत्येकी २५ लाख !

0

पुणे :

पुण्याच्या मांजरी परिसरातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीमध्ये आज दुपारी आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील बीसीजीची लस बनवली जाते, त्याठिकाणी लागल्याचे समोर आले आहे. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या प्रत्येकाच्या नातेवाईकांना सीरम इन्स्टिट्यूटकडून प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सायरस एस. पूनावाला यांनी माहिती दिली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सायरस एस.पूनावाला यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मृतांच्या नातेवाईकांना मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच ते म्हणाले की, ‘आमच्या कंपनीला लागलेल्या आगीमध्ये खूप मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबियांबद्दल आम्ही दु:ख व्यक्त करतो. मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत करत आहोत’.

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यातील दोन, उत्तर प्रदेशातील दोन आणि बिहार येथील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रतिक पाष्टे (डेक्कन पुणे), महेंद्र इंगळे (पुणे), रमाशंकर हरिजन (उत्तर प्रदेश), बिपीन सरोज (उत्तर प्रदेश), सुशीलकुमार पांडे (बिहार), अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

पुण्याच्या मांजरी परिसरात ही आग लागली असून दुसऱ्या मजल्यावरुन धुराचे लोट दिसत आहेत. ज्या ठिकाणी ही आग लागली आहे ती आग बीसीजी लसीचे उत्पादन सुरु असलेल्या इमारतीला लागली आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या कोविशिल्ड लसीचे उत्पादन सुरु असलेले ठिकाण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शुक्रवार, 22 जानेवारी रोजी दुपारी पुणे येथे सीरम इन्स्टिट्यूटला प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.

See also  नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नाने 'पावर्ड एअर प्युरीफयिंग रेस्पिरातर' मशीनचे वाटप