दुसऱ्या कसोटीत शमी ची जादू, ऑस्ट्रेलियाचा डाव 263 धावांवर संपवला

0

नवी दिल्ली :

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारी (17 फेब्रुवारी) दिल्ली येथे सुरुवात झाली. अरुण जेटली स्टेडियम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवशीच ऑस्ट्रेलियाचा डाव 263 धावांवर संपवला.

त्यानंतर भारतीय संघाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 21 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व उस्मान ख्वाजा यांनी या दौऱ्यावर प्रथमच संघाला 50 धावांची सलामी दिली.‌ त्यानंतर ख्वाजा व‌ लॅब्युशेन यांनी 41 धावांची भागीदारी केली. मात्र, रविचंद्रन अश्विन याने लॅब्युशेन व अनुभवी स्टीव्ह स्मिथ यांना केवळ तीन चेंडूंच्या अंतराने तंबूत पाठवत ऑस्ट्रेलियाचे तीन सर्वात अनुभवी फलंदाज तंबूत पाठवले. एका बाजूने इतर फलंदाज बाद होत असताना ख्वाजा याने अर्धशतक साजरे केले.

त्याने पीटर हॅंड्सकॉम्बसह पाचव्या गड्यासाठी 59 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. तो शतकाकडे मार्गक्रमण करत असताना केएल राहुल याच्या अप्रतिम झेलाने तो 81 धावांवर बाद झाला. त्यानंतर हॅंड्सकॉम्ब व कर्णधार पॅट कमिन्स या 60 धावांची भागीदारी केली. मात्र, जडेजा याने एकाच षटकात कमिन्स व मर्फी यांना बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव अखेरीकडे नेला. अखेरीस मोहम्मद शमी याने अखेरचे दोन बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचा डाव 263 वर संपवला. पीटर हॅंड्सकॉम्ब 72 धावांवर नाबाद राहिला. भारतासाठी शमीने सर्वाधिक चार बळी मिळवले. तर, अश्विन व जडेजा या फिरकीपटूंनी प्रत्येकी दोन बळी आपल्या नावे केले.

दिवसातील उर्वरित 9 षटकात रोहित शर्मा व केएल राहुल यांनी भारतासाठी सांभाळून फलंदाजी केली. दिवसातील अखेरच्या षटकात पंचांनी लायनच्या गोलंदाजीवर रोहितला बाद देखील ठरवले होते. मात्र, तिसऱ्या पंचांकडे दाद मागितल्यानंतर रोहित नाबाद ठरवला गेला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित 13 व राहुल 4 धावा काढून खेळत होता.

See also  बांगलादेशचा भारतावर एक गडी राखून विजय...