ज्या ज्येष्ठांकडे स्मार्टकार्ड नाही, अशांना आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्रांवर प्रवास करण्याची मुभा…

0

मुंबई :

बनावट ओखळपत्रांचा सुळसुळाट सुरू असल्याने यावर आळा घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) स्मार्टकार्ड योजना आणली. ती योजना वर्षभरातच गुंडाळल्याने ज्या ज्येष्ठांकडे स्मार्टकार्ड नाही, अशांना आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्रांवर प्रवास करण्याची मुभा द्यावी, असे आदेश एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी दिले.

65 ते 75 वर्षे वयोमान असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासात 50 % तर 75 वर्षांवरील ज्येष्ठांना पूर्णपणे मोफत प्रवासांची सवलत दिली आहे. याचा लाभ घेणाऱ्यांपैकी अनेकांकडे बोगस आधारकार्ड आढळून आले होते. याला आळा घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना अंमलात आणली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी हजारो ज्येष्ठांनी अर्ज केले. अनेकांनी हे कार्ड मिळाले. मात्र गेल्या वर्षभरापासून कार्ड वितरण बंद असल्याने अनेक ज्येष्ठांना प्रवासादरम्यान अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे वाहक आणि ज्येष्ठांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत होते. वादावादीचे प्रसंग टाळण्यासाठी एसटीने हा निर्णय घेतला आहे.

या ओळखपत्रांवरही मिळेल सवलत

ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे स्मार्ट कार्ड नाही, अशा ज्येष्ठांना आता ओळखपत्रांवर प्रवासात सवलत मिळणार आहे. यासाठी त्या ज्येष्ठांकडे आधार कार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, केंद्र, राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र, स्मार्ट कार्ड, डीजी लॉकर आणि एम-आधार आदी ओळख ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामुळे यापुढे वाहकांनी ज्येष्ठांना स्मार्ट कार्डची सक्ती करू नये, असे आदेशात म्हटले आहे.

See also  रिचार्ज न करता इलेक्ट्रिक ट्रकने सर्वात लांब अंतर पार करण्याचा बनवला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड