राम नदीमध्ये राडारोडा टाकून अतिक्रमण…. 

0
फोटो ओळी : बाणेर पारखे मळा येथे नदीपात्र टाकलेल्या भरावाचे छायाचित्र.

पुणे: बाणेर प्रतिनिधी:-

पारखे मळा येथे राम नदीमध्ये सर्रासपणे राडारोडा टाकून अतिक्रमण केले जात असल्याचे लक्षात येत आहे. राम नदी कडेला असलेल्या गोठ्याजवळ मोठ्या प्रमाणात भराव टाकला असून त्या भरावामुळे नदी पात्रात अडथळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाणेर पारखे मळा समोरील बाजूस विधाते वस्ती आहे. राम नदीला पूर आल्यास विधाते वस्ती मध्ये हमखास पाणी शिरते, त्यामध्ये हा टाकण्यात येणारा राडारोडा ह्या पुराला आणखीन भर देणार का? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. काही वर्षापूर्वी आलेल्या पुरामध्ये विधाते वस्ती परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. तसेच काही साहित्य वाहून गेले होते, एक लहान मुलीला आपले प्राण गमवावे लागले होते. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाहा मुळे दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे.

बाणेर बालेवाडी परिसरात नदीच्या व नाल्यांच्या कडेला अनेक ठिकाणी भराव टाकून अतिक्रमण केलेले आहे. त्याचेही सर्वेक्षण होणे महत्त्वाचे असून पुढील काळामध्ये पावसाळ्यामध्ये मोठी दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने योग्य ती दखल घेतली जावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

याबाबत अशोक मुरकुटे मा. पंचायत समिती सदस्य यांनी सांगितले की, नदीमध्ये भराव टाकून अतिक्रमण करण्याचे काम सुरू आहे. यामुळे विधाते वस्ती परिसरात धोका निर्माण होणार असून प्रवाह रोखण्याचे काम सुरू आहे. स्मार्ट सिटी मध्ये अनेक विकास कामे होत असताना, नदी व नाले वर होणारे अतिक्रमण याकडे का दुर्लक्ष केले जात आहे. नदी व नाल्यांची पाहणी करून अतिक्रमण करणार्‍यांवर व भराव टाकणार यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

See also  पाणीगळती ठिकाणी टाकलेले डांबर वाहून गेले.