राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना झेड प्लस सुरक्षा द्यावी सुप्रिया सुळे यांची केंद्रिय गृहमंत्री अमित शहांकडे मागणी

0

मुंबई :

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे.

तर, दुसरीकडे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है असा इशारा प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत थेट केंद्रिय गृहमंत्री अमित शहांकडे या घटनेची तक्रार केली आहे.

ट्विटमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, ‘गृहमंत्री अमित शहा जी, शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात महाविकासा आघाडीच्या आमदारांबद्दल हिंसक विधाने करून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, या आमदारांकडून महाविकास आघाडीच्या आमदारांच्या सुरक्षेला असलेला वाढता धोका पाहून तुमच्या भाजप पक्षासोबत युतीचे सरकार चालवणाऱ्या लोकांच्या या वृत्तीवर कारवाई करावी आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, असे ट्विट करत त्यांनी आमदारांना सुरक्षा पुरवण्याची विनंती आहे.

तसेच पुढे सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीशी असभ्य वर्तन केले आहे. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरात लवकर चर्चा करावी आणि परिस्थिती पाहता शिंदे गटाच्या आमदारांना कायदा व लोकशाही मूल्ये शिकवावीत. असेही सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्य़े लिहीले आहे.

भारत गोगावले नेमकं काय म्हणाले होते ?
आम्ही कुणाच्या मार्गात जात नाहीत, आमच्या मार्गात कुणी येऊ नये. जर आमच्या मार्गात आलं तर आम्ही सोडणार नाही, असं गोगावले म्हणाले. तुम्हाला धक्काबुक्की झाली का? असं विचारलं असता ते म्हणाले अरे हाड! ते काय आम्हाला धक्काबुक्की करणार, आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही डरफोक नाहीत, असं गोगावले म्हणाले.

See also  शिवजयंती साजरी करण्यासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर.