छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारसरणी प्रमाणे एक पाऊल पुढे टाकता आले तर या स्मारकाचे सार्थक होईल : नाना पाटेकर

0

बाणेर :

बाणेर गावच्या इतिहासातील सुवर्णक्षण छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला स्वराज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रल्हाद सायकर आणि नगरसेविका स्वप्नाली सायकर यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

याप्रसंगी बोलताना अभिनेते नाना पाटेकर यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करणे सोपे आहे परंतु त्यांच्या विचाराचे अनुकरण करून त्यांच्या विचारसरणीप्रमाणे एक पाऊल जरी पुढे टाकता आले तर स्मारकाचे सार्थक झाले. हेच विचार घेऊन जीव ओतून प्रल्हाद सायकर यांनी सर्वांना एकत्र करून सर्वांना अभिमान वाटावे असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक तयार केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना एकत्र करून महाराजांनी स्वराज्य स्थापले, त्यामुळेच त्यावेळी कोणी असमाधानी नव्हता. इतिहासाच्या नावाखाली कोणी विकृती पेरू नये, ज्या दिवशी माणूस म्हणून एकमेकांना आपण ओळखू त्या दिवशी या स्मारकाचा सन्मान झालेला असेल. एकमेकांना प्रेमाने मिठी मारल्यास सर्व द्वेष दूर होतील. सातबारा वरती जमीनी नाही तर माणसे वाढली पाहिजे असे ते म्हणाले.

राजकारणातील सर्व चांगली माणसे एकत्र आली सर्वसामान्यांचं भलं होईल. पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात येणाऱ्या ला ५ वर्ष कोणतेही पद देऊ नये म्हणजे कोणीच पक्ष बदलणार नाही. मृत्यूला तळहातावर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जगविले आहे या आपल्या राजाचा सन्मान करायचा असेल तर तशी वृत्ती बनवा, असे अभिनेते नाना पाटेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर बोलताना स्वराज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रल्हाद सायकर म्हणाले की, शासन धोरणा प्रमाणे कोणताही निधी उपलब्ध नसताना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक करण्यासाठी आव्हान केल्यानंतर निधीची कोणतीच कमतरता पडली नाही. परिसरातील अनेकांनी स्वच्छेने मदत केली. स्मारका सोबत गरजू मुलांना एमपीएससी अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका व लायब्ररीची व्यवस्था केली आहे. अनिकेत मुरकुटे यांनी त्यासाठी पुस्तके दिली. हि लायब्ररी सगळ्यांनी पाहतानाच प्रत्येकाने एखादे पुस्तक या लायब्ररी साठी आपला सहभाग म्हणून द्यावे, असे आव्हान करत आहे.

See also  पाषाण कुटी रुग्णालयात लवकरच सुरु होणार लसीकरण. 

शिवाजी महाराजांचे अस्तित्व काय आहे हे दाखवून देऊन प्रल्हाद सायकर यांनी जिद्द व चिकाटीने केलेल्या कामामुळे हे स्मारक उभे केले. पक्ष संघटना व राजकारण, राजकीय विचार बाजूला ठेवून सर्वांना सामावेश करत शहरातील आदर्श स्मारक उभे केले. असे गौरवोद्गार पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काढले, तसेच यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी देखील प्रल्हाद सायकर यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.

यावेळी खासदार गिरीश बापट, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेवक दिपक पोटे, नगरसेविका अर्चना मुसळे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, डॉ. दिलीप मुरकुटे, अशोक मुरकुटे, हभप चंद्रकांत वांजळे, मा. नगरसेवक सनी निम्हण, गणेश घोष, प्रकाश बालवडकर, लहू बालवडकर, गणेश कळमकर, राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, सचिन दळवी, अविनाश कांबळे, नारायण चांदेरे, सुनील माने,बाळासाहेब रानवडे, मधूकर मुसळे, अनिकेत मुरकुटे, डॉ. सागर बालवडकर, नितिन रणवरे, राजेन्द्र मुरकुटे, रोहन कोकाटे, आणि परिसरातील विविध मंडळे आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कळमकर यांनी केले तर आभार अनिकेत मुरकुटे यांनी मानले.