योगीराज पतसंस्थेने गरीब मुलीला संपूर्ण उच्च शिक्षणासाठी घेतले दत्तक….

0

बाणेर :

योगीराज पतसंस्थेच्या वतीने श्रुती चमरे या अतिशय गरीब मुलीला संपूर्ण उच्च शिक्षणासाठी (बी टेक) दत्तक घेतले. चार वर्षाच्या या शिक्षणाचा पहिल्या वर्षीचा 25,764/- रुपयांचा धनादेश श्रुती चमरेला अभिनव शिक्षण संस्थेत फुट बॉलच्या “विद्यांचल ट्रॉफी” प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, दरवर्षी संस्था दहावीच्या परिक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या गरीब मुलांना दरमहा 1000 रुपये शिष्यवृत्ती देत असते. वडील सांभाळ करत नसलेल्या चमरे या मुलीची गरीबी पाहून 2019 साली 97% गुण मिळाल्या बद्दल संस्थेने तिला शिष्यवृत्ती दिली. इयत्ता 11 वी मध्ये श्रुतीने 95% तर 12 वी मध्ये तब्बल 98% गुण मिळविले. परंतू उच्च शिक्षणाचा खर्च पेलणार नसल्याने श्रुतीचे आजोबा हतबल झाले. श्रुतीची शिक्षणाची आवड व हुशारी पाहुन तिच्या संपुर्ण उच्च शिक्षणाचा खर्च संस्थेतर्फे करणार आहोत. तसेच अभिनव शिक्षण शाळेत सुरु असलेल्या फुट बॉलच्या “विद्यांचल ट्रॉफी” मधील विजेत्या प्रथम, द्वितीय व तृतीय संघास अनुक्रमे 3 हजार, 2 हजार व 1 हजार रुपयांचे पारितोषिक योगीराज पतसंस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे. संस्था नेहमीच कला, क्रिडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील मुलांना प्रोत्साहन देण्याचे काम करत असते.

श्रुती चमरे हिने याप्रसंगी सांगितले की, योगीराज मुळे माझे इंजिनियर बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे. संस्थेने माझ्यावरील दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार आहे. योगीराज पतसंस्थेमुळे माझे आयुष्य घडणार आहे.

रोटरी क्लब च्या अध्यक्षा भावना उल्लंगवार, योगीराज पतसंस्थेचे संचालक राजेश विधाते यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच खेळाडू व चमरे या मुलीला शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अशोकराव मुरकुटे, योगीराज पतसंस्थेचे शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, रोटरी क्लबचे सुखानंद जोशी, रविंद्र उल्लंगवार उपस्थित होते.

आलेल्या सर्वांचे आभार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे यांनी मानले.

See also  श्री तुकाई विकास सेवा ट्रस्ट द्वारे नवरात्र उत्सवाचे आयोजन..!