संभाजी पुलावरून क्रॉस होणार्‍या मेट्रो ट्रॅकचा फोल्डींग मेट्रो पुल किंवा पुलाची उंची वाढवण्याचा आग्रह सोडून द्यावा लागणार : मुरलीधर मोहोळ

0

पुणे :

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी संभाजी पुलावरून क्रॉस होणार्‍या मेट्रोचा ट्रॅक फोल्डींगचा करायचा झाल्यास सध्या उभारलेले मेट्रोचे ३९ पिलर्स हटवावे लागणार आहेत. हे पिलर्स हटविणे व नवीन उभारण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार असून सुमारे ७० कोटी रुपयांनी खर्च वाढणार असल्याचा अहवाल महामेट्रोने दिला आहे. त्यामुळे या फोल्डींग मेट्रो पुल किंवा पुलाची उंची वाढवण्याचा आग्रह सोडून द्यावा लागणार असून विहीत मुदतीत मेट्रो सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

वनाज ते रामवाडी मार्गावर वनाज डेपो ते गरवारे महाविद्यालय स्थानकापर्यंतचे मेट्रो मार्गीकीचे स्थापत्य विभागाचे काम बर्‍यापैकी झाले आहे. पुढे गरवारे महाविद्यालय ते नदीपात्रातून कॉंग्रेस भवन व पुढील भागात पिलर्स उभारले असून ट्रॅकचेही काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, गणेशोत्सवामध्ये विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार्‍या मंडळांच्या देखाव्यांना संभाजी पुलावरून जवळपास २२ फूट उंचीवरून जाणार्‍या मेट्रो मार्गीका अडचणीची ठरणार अशी भुमिका काही मंडळांनी घेतली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या अगदी दुसर्‍या दिवसापासून सुरू होणारे काम थांबविण्यात आले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ, मंडळांचे प्रतिनिधी, विरोधी पक्षांचे नगरसेवक तसेच मेट्रो, वाहतूक पोलिसांची संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल व काही मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी टिळक पुलावर फोल्डींगचा मेट्रो उड्डाणपुल करावा, असा आग्रह धरला होता. अखेर महापौर मोहोळ यांनीही मेट्रोच्या अधिकार्‍यांना यासर्ंभातील अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

महामेट्रोच्या अधिकार्‍यांनी आज महापौर मोहोळ यांना हा अहवाल दिला आहे. त्यामध्ये संभाजी पुलावरून जाणार्‍या मेट्रो उड्डाणपुलाची उंची ४० फुटांपर्यंत वाढविल्यास सुमारे ९७८ मी.ची मार्गीका बाधित होणार आहे. यासाठी सध्या उभारलेले ३९ पिलर्स काढावे लागतील व नव्याने उंच पिलर्स उभारावे लागतील, यासाठी दोन वर्षे कालावधी लागेल व ६९ कोटी ७० लाख रुपये खर्च येईल. तसेच पुलाची उंची ३० फुटांपर्यंत वाढविल्यास ४७८ मी. चा ट्रॅक बाधित होउन १७ पिलर्स काढून नवीन पिलर्स उभारावे लागतील. यासाठी दीड वर्ष लागतील व २३ कोटी रुपये खर्च वाढेल, असे या अहवालात नमूद केले आहे. यासोबतच या बदललेल्या कामांसाठी विविध विभागांच्या नव्याने परवानग्या व अन्य तांत्रिक बाबींचीही पूर्तता करावी लागणार आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणते मास्क घालणे टाळावे आणि कोणते मास्क घालावे याची दिली माहिती

यासंदर्भात बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, महामेट्रोच्या अहवालानुसार पुलाच्या रचनेमध्ये बदल करायचा झाल्यास आर्थिक नुकसान तर होणारच आहे,
परंतू संपुर्ण मेट्रो प्रकल्पाच विलंब लागणार आहे. अनेक मंडळांनी सद्यस्थितीतील डिझाईननुसारच पूल उभारावा,
अशी सूचना केली आहे. तर ज्यांनी डिझाईन बदलण्यासाठी आग्रह केला आहे, त्या गणेश मंडळांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनाही पुणेकरांना सार्वजनिक वाहतूक सेवा लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी आग्रह मागे घ्यावा. भविष्यात ज्या मिरवणूक रथांना अडचणी जाणवतील, त्यांनीही पुलाच्या उंचीनुसारच रथ करावेत अशी विनंती राहील. तीन महिन्यांपासून थांबलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत.