५० टक्के आसन क्षमतेने नाट्यगृह व चित्रपट गृहे सुरू करण्यास महानगरपालिकेची परवानगी

0

पुणे:

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शहरातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल होत आहेत. गेल्या आठवड्यात महापालिकेने महाविद्यालये देखील सुरू करण्याची परवानगी दिली. गेल्या काही दिवसांपासून नाट्यगृहे, चित्रपट गृहे सुरू करण्याची मागणी केली जात होती.

त्यानुसार राज्य शासनाने ११ आॅक्टोबर रोजी याबाबत आदेश दिले होते. शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने आज आदेश काढले आहेत. हे आदेश पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांना देखील लागू आहेत.

राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील नाट्यगृहे, चित्रपट गृहे गेल्या काही महिन्यांपासून बंद होती. मात्र, आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने ५० टक्के आसन क्षमतेने नाट्यगृह व चित्रपट गृहे सुरू करण्यास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी परवानगी दिली आहे. याबाबत आज (बुधवारी) आदेश काढले आहेत.

चित्रपटगृहे सुरू करताना या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी, ठिकठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करावी. चित्रपटगृहात लसीचे दोन्ही डोस झालेल्या नागरिकांसह १८ पेक्षा कमी वय असलेल्या मुलांना प्रवेश असेल. प्रवेशद्वारावर प्रत्येक नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग करावी, चित्रपटगृहात एक खर्ची सोडून नागरिकांनी बसावे, ज्या खुर्चीवर बसायचे नाही त्यावर ‘आसनांचा वापर करून नये’ असे लिहावे. तिकीट, खाद्य पदार्थ्यांचे स्टॉल येथे शक्यतो डिजिटल पेमेंटची व्यवस्था असावी, स्वच्छतागृहे, पॅसेज यांचे वारंवरार निर्जंतुकीकरण करावे. आदेशातचित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच कोरोना प्रतिबंधक साधनांचा वापर करावा, असे आदेशात नमूद केले आहे.

नाट्यगृह, चित्रपट गृहात गर्दी होऊ नये यासाठी संबंधित व्यवस्थापनांना काळजी घ्यावी लागणार आहे. नाट्यगृहातील कलाकार, इतर कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करणे आवश्‍यक आहे. देखावे, प्रसाधनगृहे, रंगभूषा कक्ष यांची नियमीत स्वच्छता करावी त्यासाठी वेळापत्रक निश्‍चीत करावे. कलाकार कक्षात कलाकारांशिवाय इतर कोणालाही जाण्याची परवानगी नाही. तसेच नाटकापूर्वी किंवा संपल्यानंतर रंगमंचावर जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. अभिनेत्यांनी रंगभूषा व केशभूषा स्वतः करण्याचा प्रयत्न करावा, रंगभूषा, केशभूषा करणाऱ्या व्यक्तींनी फेसशील्ड, पीपीई किट घालावे. नाटकासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे, साहित्याचे वेळोवेळी पूर्णपणे निर्जंतुकीकरण केले पाहिजे असे शासनाच्या आदेशात नमूद केले आहे.

See also  आंबिल ओढा सीमा भिंतीचे काम कधी पुर्ण होणार ?