मनसेची पुणे महानगरपालिकेच्या साठी जोरदार तयारी, राज ठाकरे पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर.

0

पुणे :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौरा करणार आहेत. राज ठाकरे यांच्या हस्ते पुणे शहरातील सर्व शाखाध्यक्षांना नेमणूक पत्राचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठीच राज ठाकरे शुक्रवारी 8 ऑक्टोबर व शनिवार 9 ऑक्टोबर रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय हालचाली सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेही जोरदार तयारी करीत आहे. याच उद्देशाने राज ठाकरे पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. पुण्यात नेमकं कोणतं राजकीय चित्र दिसून येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राज ठाकरे यांचा दोन दिवसीय पुणे दौरा

शुक्रवार सायंकाळी 5 वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते पुणे शहरातील सर्व शाखा अध्यक्ष यांना नेमणूक पत्र वितरण देण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता शहर पदाधिकारी बैठक होणार आहे. यावेळी 9 शहर संघटक, 6 शहर सचिव, 9 विभाग सचिव बैठकीला उपस्थित असणार आहेत. यानंतर सायंकाळी 6.30 वाजता 3 राज्य उपाध्यक्ष, 4 राज्य सरचिटणीस, 1 कार्यालयीन प्रमुख, 1 प्रसार माध्यम प्रमुख, 1 राज्य सचिव प्रवक्ता यांच्यासोबत बैठक होईल.

शनिवारी 9 सप्टेंबर रोजी पीवायसी जिमखाना भांडारकर रोड बाल शिक्षण मंदिर समोर सकाळी 10 वाजता 10 उपशहर अध्यक्ष, 8 विभाग अध्यक्ष यांच्यासोबत बैठक पार पडेल. त्यानंतर सकाळी 11 वाजता 18 आजी माजी नगरसेवकांसोबत बैठक होईल.

भाजप-मनसे युतीबाबत काय निर्णय घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभार रचना जाहीर होताच प्रत्येक पक्षानं आतापासूनच कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेनंतर संपूर्ण राज्याचं लक्ष हे पुणे महापालिकेकडे लागलं आहे. यंदा पुण्यात भाजपा आणि मनसे युती करावी अशी चर्चा मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यावरूनच पुण्यात सत्ताधारी भाजपा आणि मनसे एकत्र निवडणूक लढवतील. तशी विनंती आम्ही राज ठाकरे यांच्याकडे करु असं मनसे पदाधिकारी सांगत होते. असं असतानाच राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तुर्तास तरी युतीच्या चर्चा थांबवा. वेळ बघून निर्णय घेऊ, असं सांगत पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर येण्याचं नियोजन केलं आहे. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर असणार आहेत.

See also  भाजप नगरसेवक महेश लडकत यांचे निधन.