थोडा विचार, थोडी थट्टा करत आपला गिरिधर कट्टा मैत्रीपूर्ण वातावरणात सुरु …!

0

बाणेर :

बाणेर येथे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत पत्रकारांच्या समन्वयातून थोडा विचार थोडी थट्टा आपला गिरिधर कट्टा सुरु करण्यात आले. विशेष म्हणजे सर्वच पक्षातील प्रतिनिधींनी गिरीधर कट्ट्याला आवर्जून भेट देऊन खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गप्पा मारत एकमेकांच्या विचारांना दाद दिली. गिरधर कट्ट्यावरती विविध राजकीय व सामाजिक विषयांवर मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये चर्चा झाल्या.

गिरीधर कट्टा या वैचारिक संकल्पनेतून एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. शहरातील काही कट्टे प्रसिद्ध आहे त्याच पद्धतीने पुण्याचे वलय ठेवणारा उपनगरांमध्ये हा कट्टा सुरु करण्यात आला आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, औंध, सुस, म्हाळुंगे, सोमेश्वरवाडी या भागातील विविध समस्या तसेच सामाजिक विषयांचा चर्चात्मक विचार होऊन सामाजिक हित जोपासले जावून वेगवेगळे विषय सोडविण्याच्या दृष्टीने देखील नवनवीन मार्ग मिळू शकतात. अशा या गिरीधर कट्ट्याला सुरुवात झाली असुन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सकाळी ९ वाजता गिरीधर कट्टा थोडा, विचार थोडी थट्टा होणार आहे असे सर्वानुमते ठरवण्यात आले.

गिरिधर कट्टा संकल्पना मांडणारे पत्रकार केदार कदम म्हणाले, स्मार्ट सिटी परिसरामध्ये स्मार्ट संकल्पना उदयास आल्या पाहिजेत. यासाठी सर्व विषयांवर संवाद असला पाहिजे. यासाठी सर्वच पक्षांच्या नेतृत्वाचे स्वागत करणारा कट्टा म्हणून गिरधर कट्टा हा परिसर व विचार विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आजच्या गिरीधर कट्ट्याला उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानताना भारतीय जनता पार्टीचे राहुल कोकाटे यांनी सांगितले की, गिरीधर कट्ट्याच्या संकल्पनेतून वैचारिक जडणघडण घडणार आहे. विविध सामाजिक विषय यामधून बाहेर येतील. असाच आपल्या भागातील पर्यावरण हा विषय लक्षात घेऊन काही संस्थांमधील कार्यकर्त्यांसह पुढील गिरीधर कट्ट्याला भेट होईल. सगळ्यांचे आभार मानताना त्यांनी जे उपस्थित नाही यांनी देखील या चांगल्या उपक्रमात उपस्थिती दाखवून विचारांची देवाण-घेवाण करावी असे आव्हान त्यांनी यावेळी केले.

यावेळी भाजपचे प्रकाश बालवडकर, शिवसेनेचे डॉ. दिलीप मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सागर बालवडकर, काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवाजी बांगर, भाजपचे लहु बालवडकर, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, राहुल कोकाटे, काँग्रेसचे जीवन चाकणकर, मनसे चे अनिकेत मुरकुटे तसेच पत्रकार केदार कदम, बाबासाहेब तारे, मोहसीन शेख, अभिराज भडकवाड, अर्जुन पसाले आदी उपस्थित होते.

See also  बाणेर वसुंधरा रक्तदान शिबिरामध्ये १०६ पिशव्यांचे संकलन.