काँग्रेसने दर्शवली पुणे महानगर पालिकेत आघाडी करण्याची तयारी, भाजपला हरवण्यासाठी तीनही पक्ष एकत्र येणार !

0

पुणे :

स्थानिक स्वराज्य निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेसने यापूर्वी जाहीर केले होते. मात्र, आता काँग्रेसने युटर्न घेत आपली भूमिका बदलली आहे. भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने पुणे महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपला हरविण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात असे राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आगामी महापालिका निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. यापूर्वी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनेकवेळा याबाबत सांगितले. मात्र, तीनचा प्रभाग झाल्यानंतर काँग्रेसची भूमिका बदलली आहे का असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आला.

बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेस, काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत. आम्ही एकत्र राज्य सरकारमध्ये आहोत. चांगल्या पद्धतीने सरकार चालवत असून आम्ही एकत्रच आहोत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हा आमचा उद्देश आहे. ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे तेथे आम्ही एकत्रच जात असल्याचे थोरात यांनी सांगितले.

प्रभाग रचनेकडे पक्षीय दृष्टीकोनातून बघू नका

तीन प्रभाग रचनेबाबत थोरात म्हणाले, महापालिका निवडणुकीबद्दल आमच्यात मतमतांतरे होती. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमच्यात चर्चा झाली, पण वाद झाले नाहीत. प्रभाग रचनेकडे पक्षिय दृष्टीकोनातून बघू नये, हे निर्णय फक्त सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचे नाहीत तर सर्वांच्या फायद्याचे आहेत.

निवडणुकीमध्ये जास्त जणांना समावून घेण्यासाठी तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला पक्षीय स्वरूप नसल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.

See also  मृतांच्या नातेवाईकांना सीरम इन्स्टिट्यूटकडून प्रत्येकी २५ लाख !