झोपडपट्टी मुक्त पुणे करण्याची अजित पवार यांची घोषणा

0

पुणे :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे झोपडपट्टी मुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आपल्याला पुण्याचा चेहरामोहरा बदलायचा आहे, असं सांगतानाच शहरातील 17 झोपडपट्ट्यांबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय घेण्यात येणार असून झोपडपट्टीमुक्त पुणे झालंच पाहिजे, अशी घोषणाच अजित पवार यांनी आज केली आहे.

स्थानिक नगरसेवक सदानंद शेट्टी यांच्या पुढाकाराने मंगळपेठेतील 130 कुटुंबांचे एसआरए अंतर्गत पुनर्वसन करण्यात आले आहे. या कुटुंबांना आज उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते घरांच्या चाव्या देण्यात आल्या. या चावी वाटप आणि करारनामा लोकार्पण सोहळ्यामध्ये अजित पवार बोलत होते.

अजित पवार यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतही इशारा दिला. तिसऱ्या लाटेचं संकट आज केरळात आलं आहे. केंद्राने आपल्याला काळजी घेण्याचं कळवलं आहे, असे नमूद करीत त्यांनी महाराष्ट्राला नजीकच्या काळात तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे संकेत दिलेत. या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी आपल्याला केंद्राने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सूचित केले. कोरोनामुळे मागील सव्वावर्षात सर्वांनाच महत्वाचे कार्यक्रम घ्यायला मर्यादा आल्या आहेत, असे ते म्हणाले.

तुम्हाला सन्मानाने जगता यावे, हा या योजनेमागचा हेतू

अजित पवार यांनी सदनिका धारकांना नव्या घरात प्रवेश करुन चांगल्या जीवनाची सुरुवात करण्याचा सल्ला दिला. ज्यांना घर मिळणार आहे त्यांनी ते विकण्याच्या फंदात पडू नये. तुम्हाला सन्मानाने जगता यावे, हा या योजनेमागचा हेतू आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी मला पुण्याचा पालकमंत्री होण्याची संधी दिलीय. पुणेकरांच्या नावाला धक्का लागत असेल तर त्याला लगाम घातला पाहिजे, तसा धक्का लागू देणार नाही. तसेच पुण्यातील मेट्रोचा प्रश्न मार्गी लावला जाईल. सहकार भवन, कामगार भवन, कृषी भवन पुण्यात निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही अजित पवार म्हणाले.

See also  लॉकडाऊन मागे घेतला नाही तरी दुकाने उघडणारच : पुणे व्यापारी महासंघ