ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू राहील : पंकजा मुंडे

0

लातूर :

स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकीय आरक्षण जोपर्यंत पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू राहील, आरक्षण पूर्ववत झाल्यानंतरच राज्यात निवडणुका होतील अशी भूमिका भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मांडली. लातूर येथे पार पडलेल्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींच्या महाजागर महामेळाव्याला संबोधित करताना त्या बोलत होत्या.

यावेळी मंचावर माजी मंत्री राम शिंदे, आ.संभाजी पाटील निलंगेकर, आ.नरेंद्र पवार, आ.रमेश कराड, आ.अभिमन्यू पवार, खा. सुधाकर शृंगारे, योगेश टिळेकर, सुधाकर भालेराव, गोविंद केंद्रे, पाशा पटेल, राहुल केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.मेळाव्याच्या सुरुवातीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले व तदनंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले.

यावेळी ओबीसी समाज बांधवांनी पंकजा मुंडे यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की ‘आमच्या बहुजन समाजातील माणूस सामाजिक दृष्ट्या कुपोषित आहे,त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे.मात्र पन्नास टक्क्यांपेक्षा जास्तीच्या आरक्षणाचा विषय असताना राज्य सरकारने इंपेरिकल डाटा सादर न केल्यामुळे पन्नास टक्क्यांच्या आत असलेले हक्काचे आरक्षणही गेले आहे.यामुळे ओबीसी समाजासमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्य सरकारने तात्काळ इंपेरिकल डाटा तयार करावा व ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करावे,जोपर्यंत आरक्षण पुनर्स्थापित होणार नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थितांना आवाहन करताना आरक्षणाचा लढा एकजुटीने लढण्याचे आवाहन त्यांनी केले.समाजातील वंचित, शोषितांची सेवा करणे हाच आपला वसा आणि वारसा असल्याचे सांगताना तुमच्या सेवेचे वाण खाली पडू देणार नाही असा विश्वास ही त्यांनी ओबीसी समाज बांधवांना दिला. वंचितांचा लढा लढणे आणि ज्यांचा कुणी वाली नाही त्यांची वाणी होणे ही माझी भूमिका असल्याचे सांगत तुमच्या हितासाठी प्रधानमंत्र्यांसह सर्वांना भेटण्याची माझी तयारी आहे,रोज वेगळी भूमिका घेणारा नेता बनू शकत नाही,आपली भूमिका निर्भीड आणि स्पष्टपणे मांडणाराच नेता बनू शकतो,जोपर्यंत आपल्या हक्काचे आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत एकजुटीने हा लढा लढायचा असल्याचे त्यांनी म्हंटले.

See also  न्यायालयाचा निर्णय आल्यावर ईडीला सामोरे जाणार : अनिल देशमुख