अजित पवारांचा विरोधात पुरावे द्या खरं असेल तर मी स्वतः तक्रार करेन : सुप्रिया सुळे

0

पुणे :
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात असलेल्या स्थानिकांच्या घरावर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५ घरं पाडण्यात आली. न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पाडापाडी थांबण्यात आली. मात्र, पाडण्यात आलेल्या घरांवरून स्थानिक आक्रमक झाले आहेत. या कारवाईचे पडसाद आज उमटले, ते पुणे महापालिकेच्या समोर. नागरिकांनी ठिय्या मांडत इथे आंदोलन सुरू केलं, मोठ्या संख्येनं लोक जमा झाले होते.

दरम्यान, यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेतली. महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल सुळे यांनी माहिती घेतली. यावेळी आंदोलकांनी कारवाई का करण्यात आली, पुन्हा घरं बांधून देण्याची मागणी केली. त्याचबरोबर घरं पाडल्याबद्दल अजित पवार मुर्दाबाद, पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी घोषणाबाजी केली. आमची घरं अजित पवारांनी पाडली तुम्ही इथे का आलात असा सवालही आंदोलकांनी विचारला.

यावेळी ‘अजित पवारांचा विरोधात पुरावे द्या खरं असेल तर मी स्वतः तक्रार करेन’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी आंबिल ओढा प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान यावेळी आंदोलकांवर कारवाई का करण्यात आली? असा प्रश्न विचारून आंदोलकांनी, पुन्हा घरं बांधून देण्याची मागणी केली आहे.

कात्रज तलावापासून आंबिल ओढ्याला सुरुवात होते. आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेकडून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप होत आहे. ही जागा बिल्डरच्या घशात घातली जाणार आहे, असा दावा स्थानिकांनी केला आहे. जागा बळकवण्यात लोकप्रतिनिधींचाही हात असल्याचाही आरोप केला जात आहे.

See also  दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्यास स्थायी समितीची मान्यता