लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित काम करतील : शरद पवार

0

मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, व मंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतीच राजधानी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीवेळी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मेट्रो कारशेड यासह १२ मुद्द्यांवर पंतप्रधानांशी चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदींनीही महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांशी सविस्तर चर्चा केली.

मात्र यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंद दरवाज्याआड एकांतात चर्चा केली. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज्य सरकार पडणार अशा वावड्या अनेकांनी उठवायला सुरुवात केली आहे. जनता पक्षाचं सरकार आलं त्यावेळी बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना मदत करण्याचा शब्द दिला होता, तो त्यांनी पाळला. आताही शिवसेना वेगळी भूमिका घेणार नाही. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे टिकेल असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारां नी व्यक्त केला आहे. ते पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

शरद पवार पुढे म्हणाले की, “जनता पक्षाचं सरकार आलं त्यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसचा सगळीकडे पराभव होत असताना शिवसेना हा पक्ष काँग्रेसला पाठींबा देण्यासाठी पुढे आला. त्या वेळी शिवसेनेने काँग्रेसला मदत करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. त्याचाच भाग म्हणून शिवसेना विधानसभेसाठी एकही उमेदवार उभा करणार नाही असा बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना शब्द दिला आणि तो पाळला. हा इतिहास आहे.”

आताही पंतप्रधानांच्या भेटीनंतर शिवसेना काहीशी वेगळी भूमिका घेईल असं जर कोणाला वाटत असेल तरे ते वेगळ्या नंदनवनात राहतात असा विरोधकांचा खरपूस समाचार शरद पवारांनी घेतला. ते म्हणाले की, “आज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित काम करतात. माझा शिवसेनेसोबतचा पूर्वीचा अनुभव हा विश्वासाचा आहे. हे सरकार टिकेल, पाच वर्षे काम करेल. एवढंच नाही तर येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे तिनही पक्ष एकत्रित काम करतील यात शंका नाही.”
शिवसेना आणि आपण एकत्र येऊ हे एकेकाळी कुणालाही पटलं नसतं, पण आज एकत्र आहोत. त्यामुळे हे सरकार पडणार या निरर्थक चर्चा असल्याचं त्यांनी सांगितलं.

See also  ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्ग मध्ये राणे पॅटर्न सरस !