पुणे शहर व जिल्ह्यात होळी  व धूलिवंदन साजरे करण्यास मनाई.

0

पुणे :

राज्यात तसेच  पुणे  जिल्ह्यात  कोरोना  विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. येत्या काळात करोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव झपाट्याने पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण मिळवणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याचे नमूद करत पुणे जिल्ह्याच्या क्षेत्रात  होळी  व धूलिवंदन साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे शहरासाठीही पालिका आयुक्तांनी अशाच प्रकारचे आदेश काढले आहेत.

कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीचे उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे २८ मार्च रोजी साजरा होणारा होळी उत्सव तसेच २९ मार्च रोजी साजरा होणारा धूलिवंदन व रंगपंचमी उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.  राजेश देशमुख यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या मनाई आदेशाचे पालन करून नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे तसेच सदर आदेशामधील कोणत्याही तरतुदीचा भंग केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा- २००५ व कायद्यातील इतर तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

See also  हवामान बदलांना सक्षमपणे सामोरे जात पर्यावरणाचे जतन करावे लागेल : आदित्य ठाकरे