पुण्यातून सुटणाऱ्या एक्स्प्रेसबाबत महत्त्वाचा निर्णय; पुणेकरांच्या मागणीची दखल !

0

पुणे :

पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना आता मिरजहून थेट बिकानेरला जाता येणार आहे. पुणे-बिकानेर-पुणे साप्ताहिक एक्सप्रेसचा मिरजपर्यंत विस्तार करण्यात आलाय. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर येथील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी याबाबत माहिती दिली.

रेल्वेकडून बिकानेर-पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस मिरजपर्यंत सुरू केली होती. मात्र ही गाडी मिरजेतून पुण्यापर्यंत बिकानेरपर्यंत वेगवेगळ्या क्रमांकानं धावत होती. त्यामुळे वेगवेगळे तिकीट काढावे लागत होते. म्हणूनच ही गाडी एकाच क्रमांकानं सोडण्याची मागणी पुण्यातून मोठ्या प्रमाणात झाली. पुणेकरांनी रेल्वे समितीच्या बैठकीतदेखील यावर आपलं म्हणणं मांडलं होतं. अखेर या मागणीची दखल रेल्वेनं घेतली आहे.

आता 20475 आणि 20476 या क्रमांकाची गाडी मिरज-बिकानेर एक्स्प्रेस म्हणून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एक्स्प्रेस बिकानेरहून सोमवारी सकाळी साडेसहा वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दुपारी पावणे 2 वाजता मिरजला पोहोचेल. त्यानंतर मिरजहून दुपारी सव्वा 2 वाजता निघून एक्स्प्रेस बिकानेरला बुधवारी रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल.

या एक्स्प्रेसला कराडसह सातारा, लोणंद थांबादेखील देण्यात आला आहे. मंगळवारी लोणंदला सकाळी साडेनऊ, तर साताऱ्यात 10 वाजून 42 मिनिटांनी आणि कराडला 11 वाजून 50 मिनिटांनी गाडी पोहोचेल. त्यानंतर हीच गाडी दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी मिरजेतून सुटेल, कराडला 3 वाजून 30 मिनिटांनी, साताऱ्याला 4 वाजून 30 मिनिटांनी, लोणंदला 5 वाजून 40 मिनिटांनी, पुण्याला रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी, कल्याणला 10 वाजून 10 मिनिटांनी, भिवंडीला रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी, सुरतला पहाटे 3 वाजून 23 मिनिटांनी, वडोदराला 5 वाजून 15 मिनिटांनी, अहमदाबादला सकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी, अबू रोडला सकाळी साडेअकरा वाजता, पाळणा इथं 12 वाजून 25 मिनिटांनी, मारवाड जंक्शनला दुपारी 2 वाजता, जोधपूरला 3 वाजून 40 मिनिटांनी, मेडतारा रोडला साडेपाच वाजता आणि बिकानेरला रात्री 8 वाजून 40 मिनिटांनी पोहोचणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची या एक्सप्रेसमुळे मोठी सोय होईल.

See also  सातारा शासकिय मेडिकल कॉलेजच्या संदर्भात उदयनराजे भोसले यांनी घेतली केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट