महापालिकेच्या हद्दीतील 30 वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करणे बंधनकारक

0

पिंपरी चिंचवड :

30 वर्षे जुन्या इमारती किंवा मिळकती राहण्यासाठी योग्य आहेत किंवा नाही हे तपासण्यासाठी महापालिकेकडील परवानाधारक बांधकाम अभियंता यांच्याकडून तपासणी करणे आणि दुरुस्ती करून घेणे महत्वाचे असून नागरिकांनी एका महिन्याच्या आत आपल्या इमारतीचे संरचनात्मक लेखापरिक्षण (स्ट्रक्चरल ऑडीट) करून घेणे बंधनकारक असल्याची माहिती शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली.

राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 265 (अ) कलमानुसार जुन्या इमारती अथवा मिळकती राहण्यायोग्य आहेत किंवा नाही याबाबत महापालिकेकडील परवानाधारक बांधकाम अभियंत्याकडून तपासणी व दुरुस्ती करून घेणे आवश्यक आहे. तसेच बांधकाम सुस्थितीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तरतूद आहे. त्यानुसार जुन्या इमारतींचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ज्या इमारतींचे बांधकाम 30 वर्षे जुने आहे, अशा सर्व इमारतींचे मालक, वारसदार, भोगवटादार यांना इमारतींचे बांधकाम सुस्थितीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र महापालिकेतील परवानाधारक बांधकाम अभियंता (स्ट्रक्चरल इंजिनियर) यांच्याकडून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र प्रत्येक 10 वर्षांनी इमारत मालक, वारसदार, भोगवटादार यांनी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जुने बांधकाम सुस्थितीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र इमारत मालकांना देण्यासाठी परवानाधारक बांधकाम अभियंता यांच्याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा परवाना असणे महत्वाचे असून त्यासाठी बांधकाम अभियंता यांनी महापालिकेकडे आवश्यक असलेली कागदपत्रे जोडून अर्ज करावा. अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर 1 हजार रुपये परतावा शुल्क आकारण्यात येईल. त्यानंतर बांधकाम अभियंता यास ३ वर्षासाठी परवाना देण्यात येईल.

बांधकाम अभियंता यांना महापालिकेकडून परवाना मिळवण्यासाठी नियम व अटींची पूर्तता करावी लागणार बांधकाम अभियंता यांनी अर्ज केल्यानंतर त्यांच्या पात्रतेसंबंधित पडताळणी करण्यात येणार असुन त्यानंतर गुणात्मक विचार करून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

बांधकाम अभियंता यांच्याबाबत काही शंका असल्यास अर्ज अपात्र करण्याचा संपूर्ण अधिकार शहर अभियंता मकरंद निकम यांच्याकडे असणार. स्ट्रक्चरल ऑडीट साठी आकारण्यात येणारे शुल्क संबंधित अभियंत्यांनी इमारतीच्या मालकांकडून घ्यावे.

See also  लाखो भाविकांच्या उपस्थितीत देहूत बीज सोहळा उत्साहात…

इमारत बांधकामदृष्ट्या सुस्थितीत आहे की नाही याबाबत बांधकाम अभियंत्याकडून करण्यात येणाऱ्या संरचनात्मक लेखानिरीक्षणामध्ये बांधकाम सुस्थितीची तपासणी करून अविघातक चाचणीबरोबरच इतर चाचण्या तसेच अभिलेखाची तपासणी करण्यात येईल.

जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यासाठी बांधकाम अभियंता यांना पिंपरी चिंचवड महापालिकेचा परवाना देण्यासाठी लागणा-या सर्व कागदपत्रांची यादी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि शहर अभियंता कार्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे.

बांधकाम अभियंता नोंदणीसाठी पात्रता आणि आर्हता ही पुढील प्रमाणे असेल

कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय किंवा विदेशी विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी असणे महत्वाचे आहे. तसेच सनदी अभियंता किंवा भारतीय अभियांत्रिकी संस्थेच्या समतुल्य विदेशी संस्थेच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहयोगी सदस्य असणे महत्वाचे आहे.

बांधकाम अभियंता यांना संकल्प चित्र काढण्याचा, क्षेत्र कामे करण्याचा,बांधकाम अभियंता व्यवसायातील किमान 3 वर्षाचा अनुभव असणे महत्वाचे आहे.

बांधकाम अभियंता शाखेतील कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठाची किंवा विदेशी विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत 2 वर्षे आणि बांधकाम अभियंता या विषयातील डॉक्टरेट धारण करणाऱ्या व्यक्तीबाबत ही अट एका वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल.

बांधकाम अभियंता म्हणून नोंदणी करण्यासाठी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील स्थापत्य विभागात शहर अभियंता यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे, लेखी अर्ज हे एका महिन्याच्या आत सादर करावे. त्यानंतर बांधकाम अभियंत्यांची नोंदणी यादी तयार करण्यात येईल. ही नोंदणी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेल्या दिनांकापासून 3 वर्षासाठी वैध असणार आहे. तसेच कोणताही अर्ज स्वीकारण्याचा आणि फेटाळण्याचा हक्क पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे राहील.