शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी शैलजा दराडे यांना अटक; आतापर्यंत 5 कोटींचा घोटाळा

0

पुणे :

शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांच्यावर शिक्षक भरती घोटाळ्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्राथमिक तपासातच त्या दोषी आढळल्याने त्यांचे निलंबनही करण्यात आले होते. आज त्यांना पुणे येथून अटक करण्यात आली आहे.

शैलजा दराडे यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शैलजा दराडे या घोटाळ्या प्रकरणी अटक झालेले शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या जागी कामास लागल्या, परंतु, त्यांनीही घोटाळे केल्याने अखेर त्यांना अटक करण्यात आली.

शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शैलजा दराडे आणि त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे यांनी फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रत्येकी 12 ते 15 लाख रुपये घेऊन 44 उमेदवारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले होते. या दोघांनी मिळून सुमारे पाच कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

या प्रकरणी काही दिवसांआधी पोपटराव सूर्यवंशी यांनी तक्रार दाखल केली होती. दराडे आणि फिर्यादी यांचा 2019 रोजी झालेल्या संभाषणाची क्लिप समोर आली आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर शैलजा दराडे यांनी पुण्यातील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. दरम्यान शिक्षण आयुक्तालयानेही दराडे यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागवला होता.

त्यावर दराडे यांनी आपले म्हणणेही सादर केले होते. त्यानंतर राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी राज्य सरकारला या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल दिला होता. त्यात दराडे यांनी केलेली कृती आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.आणि याच अहवालाची दखल घेऊन दराडे यांना सरकारी सेवेतून निलंबित करण्याचे आदेश राज्य सरकारचे उपसचिव टी. वा. करपते यांनी दिले आहेत..

See also  रस्ता दुरुस्त न केल्यास खड्ड्याना कंत्राटदार व अधिकाऱ्यांची नावे देणार : अमोल कोल्हे