पंकजा मुंडे धनंजय मुंडे भगवान गडावर एकत्र, भावा बहिणीच्या नात्यातील कटुता झाली कमी..

0

भगवान गड :

भाजप नेत्या पंकजा मुंडे मागील सात वर्षांपासून भगवान गडापासून दूर राहिल्या होत्या. मात्र, आज झालेल्या भगवान गडाच्या नारळी सप्ताहात पंकजा मुंडे यांनी उपस्थित दर्शवली.

विशेष म्हणजे त्यांचे भाऊ आणि राजकीय शत्रू असलेले धनंजय मुंडे हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून दुरावा निर्माण झाला होता. तो आजच्या कार्यक्रमातून मिटल्याचे दिसून आले. या वेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ते म्हणाले की, राजकारणातली लढाई विचारांची आहे. मात्र, गडाच्या विकासासाठी आम्ही दोघांनी एकत्र यायचे ठरवले आहे…

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे हे नगर जिल्ह्यातील भगवानगड येथून दसरा मेळाव्यानिमित्त ऊसतोड मजुरांना संवाद साधायचे. त्यांच्या निधनानंतर भगवान गडावरील राजकीय मेळावा खंडित झाला. महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना राजकीय मेळावा घेण्यास बंदी घातली. त्यामुळे त्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे भगवान भक्ती गडावर मेळावा घेतात. तर धनंजय मुंडे हे माहूरगड येथे दर्शनाला जातात. मात्र, आज सात वर्षांनंतर नामदेव शास्त्री, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात भगवान बाबा भक्तांच्या मुद्द्यावरून एकमत झाल्याचे दिसून आले.

या वेळी बोलताना नामदेव शास्त्री म्हणाले की, मी राजकारण करत नाही, तुमच्या विरोधातही नाही. मी भगवान बाबांचे स्वप्न पूर्ण करतोय, हे सर्वांचे कष्टाचे पैसे आहेत. धनंजय मुंडे यांना मी १० एक्कर जमिनीचा प्रस्ताव दिला. तो त्यांनी त्वरित मंजूर केला. पंकजा मुंडे यांचे आणि माझे वैर नाही. मी राजकारणी नाही. पण एवढेच सांगेन, साधू-संतांचा आदर ठेवा, मागे बोलू नका, दोघांना माझं सांगणं आहे, अशी विनंती नामदेव शास्त्री यांनी केली.

या वेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी जिवंत असेपर्यंत भगवान बाबांच्या गादीला धक्का लागणार नाही. नामदेव शास्त्रींना उद्देशून पंकजा मुंडे म्हणाल्या की, तुम्ही शिव्या दिल्या तर आम्ही फुले म्हणून डोक्यावर घेऊ. तुम्ही जोड्याने मारले तरी चालेल.. आम्ही एकत्र येऊ नये यासाठी लोक पाण्यात देव ठेऊन बसलेत. पण जर कोणी भगवान गडाविषयी बोलले तर महाग पडेल. माझ्या पर्सनॅलिटीला तुम्ही अहंकार समजू नका. धनंजय आणि माझ्यात काही नाही, तुमच्यात आणि माझ्यात काही वैर होतं हे मला माहित नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं.

See also  पुणे शहर भाजप नगरसेवकांचा अभ्यासवर्गाला शंभर टक्के उपस्थिती.

धनंजय मुंडे म्हणाले, ‘ मी भगवान गडाचा खरा भक्त आहे. माझी हीच ओळख आहे. आज काही गज का होईना ताई माझ्याजवळ आहे. राजकारणात आम्ही किती गज दूर असलो तरी आज जवळ आलो. आमच्यात कौटुंबिक नातं आहे. मला नियतीवर खूप विश्वास आहे, माझ्यासारखा नशीबवान मीच आहे. ताई म्हणाल्या होत्या, मी भगवान गडाची पायरी आहे तर मी त्या पायरीचा दगड आहे. माझ्या सभा मोठ्या होत नाहीत, मी लहान आहे, ताईंच्या सभा मोठ्या होतात. गडासाठी जी काही जबाबदारी आहे ती आम्ही दोघे स्वीकारतो, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले.