भारत ही जगातली सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई :

भारत ही जगातली सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार होण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची असणार असून राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी फ्रेंच कंपन्यांचे सहकार्यही नक्कीच मोलाचे ठरेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हाॅटेल ताज महल पॅलेस येथे इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने (IFCCI) ‘इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र’ परिषदेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी ‘आयएफसीसीआय’चे अध्यक्ष सुमित आनंद, महासंचालक पायल कंवर, वाणिज्य दूत ज्यों मार्क सिरे-शार्ली, फ्रान्सचे व्यापारविषयक आयुक्त एरिक फॅजोल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बिपीन शर्मा, पश्चिम विभागीय संचालक श्वेता पहुजा, यांच्यासह फ्रान्स आणि भारतातील प्रमुख उद्योजक, बँकर्स, धोरणकर्ते, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

एकूण १४ फ्रेंच कंपन्या महाराष्ट्रात ₹ ५,७०० कोटी गुंतवणूक करणार असून यामुळे ५,३०० थेट रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात नवे उद्योग उभारणी, उद्योग विस्तारासाठी भारतीय आणि फ्रेंच कंपन्यांदरम्यान सामंजस्य करार होत आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. तसेच सर्वच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रही अग्रेसर आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. राज्यात युवा शक्ती मोठी आहे. हे राज्याचे बलस्थान आहे. महाराष्ट्र पायाभूत सुविधांचा विकास करणे, एक्सप्रेस वे, मेट्रो, सागरी सेतू यांसारख्या विकासकामांत वेगाने काम करत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी परिषद उपयुक्त

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्य नेहमीच उद्योगस्नेही राहिले आहे. भविष्यातही ‘कॉस्ट ऑफ डूइंग बिझनेस’ आणि ‘इज ऑफ डूइंग बिझनेस’ या दोन्हीत महाराष्ट्र सर्वोत्तम असेल. सर्व उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूकदारांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे. महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी ही परिषद अतिशय उपयुक्त ठरेल. याव्दारे संबंध अधिक दृढ होतील. फ्रान्सबरोबर विविध क्षेत्रात सहकार्यपूर्ण संबंध प्रस्थापित झालेले आहेत.

See also  सुरुवात सेनाभवनापासून केली आणि शेवट ईडी कार्यालयावर करणार : संजय राऊत

महाराष्ट्रात उद्योग उभारण्यास पुढाकार घेणाऱ्या कंपन्यांना उद्योग उभारणीसंदर्भात सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. उद्योगांच्या अपेक्षांनुसार त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उद्योगांसाठी ख-या अर्थाने सिंगल विंडो सिस्टीम तयार करण्यात आली आहे. असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्टार्ट अप्स व युनिकाॅर्नची राजधानी

महाराष्ट्र ही देशाची स्टार्ट-अप आणि फिनटेक, युनिकाॅर्नची राजधानी बनली आहे. देशाची 65 टक्के डाटा सेंटर क्षमता असणारा महाराष्ट्र आता देशाची डाटा सेंटर राजधानीही बनला आहे. पायाभूत सुविधा, नावीन्य आणि तंत्रज्ञान यांचा मेळ असणारे मॉडेल सर्वसमावेशक असल्याने राज्यातील पायाभूत सुविधांसाठी विविध प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. प्रवासाचा वेग आणि डेटाचा वेग आता प्रगती ठरवेल. ‘स्पीड आॅफ ट्रॅव्हल’ आणि ‘स्पीड आॅफ डेटा’ यावर अधिक भर देण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.