कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भूमिका देशाच्या ऐक्यासाठी घातक : शरद पवार

0

मुंबई :

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणात बेळगावमध्ये जे काही झाले ते अत्यंत निषेधार्ह आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रकरणाला जाणीवपूर्वक वेगळे रुप दिले जात आहे.

बेळगावध्ये जे घडत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारशी संपर्क साधला. परंतू, त्याचा काही उपयोग झाल्याचे दिसत नाही, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये निर्माण झालेल्या तणावात्मक परिस्थितीवर शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भूमिका देशाच्या ऐक्यासाठी घातक असल्याचेही शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये सीमावाद आहे. प्रकरण उच्च न्यायालयात आहे. न्यायालयात दोन्ही राज्यांना आपापली भूमिका मांडण्याची पूर्ण संधी असताना कर्नाटक सरकारची आगळीक धोक्याची आहे. दोन राज्यांच्या संघर्षामध्ये सुरु असताना केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेणं योग्य नाही. केंद्र सरकारने तशी भूमिका घेतल्यास देशाच्या ऐक्यालाच धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेसुद्धा या प्रश्नावर योग्य भूमिका घ्यायला हवी.

चोवीस तासात परिस्थिती नियंत्रणात आणा

महाराष्ट्र हे संयमी राज्य आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारनेही योग्य ती काळजी घ्यावी. आज बेळगावमध्ये अत्यंत विदारक स्थिती आहे. पुढच्या 24 तासात परिस्थिती नियंत्रणात आणावी नाहितर महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले जातील. महाराष्ट्रात कर्नाटकच्या कृत्याचे पडसाद उमटले तर परिस्थिती कोणत्या स्तराला जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कर्नाटक सरकारने वेळीच योग्य पावले उचलावीत.

आम्हाला बेळगावला जावे लागेल

बेळगावमध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत. कर्नाटक सरकारने वेळीच योग्य ती काळजी आणि पावले उचलली नाहीत तर माझ्यासह (शरद पवार) आम्हा सर्वपक्षीय नेत्यांना बेळगावमध्ये तिथल्या जनतेला धीर देण्यास जावे लागेल, असे शरद पवार यांनी म्हटलेआहे.

या घटना आताच का?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बेळगाव, सोलापूर आदी ठिकाणांवर दावा सांगतात. गुजरात, तेलंगणा सीमेलगतची गावे वेगळी भूमिका मांडत असल्याचे कानावर येते आहे. हे सगळं आताच का घडतं आहे? आजवर असा मुद्दा कधीच आला नाही. पण, हे सगळे आताच का घडत आहे? असा सवाल विचारत या सर्व प्रकाराला कोणीतरी चिथावणी देत असल्याचा संशयही शरद पवार यांनी केली आहे.

See also  शालेय शिक्षण विभागाने दिले 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी 15 टक्के फी कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश.

दरम्यान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नव्याने उकरुन काढला आहे. त्यांच्या विधानामुळेच परिस्थिती पुन्हा चिघळली असल्याचे शरद पवार म्हणाले.