पक्षात आणि मंत्रिमंडळात देखील फडणवीसांचा दबदबा, समर्थकांना जास्त महत्व.

0

मुंबई :

अखेर राज्यमंत्रिमंडळाच्या मंत्र्यांचं खातं वाटपही करण्यात आलं आहे. पक्ष संघटनेत स्वत:चा दबदबा निर्माण केल्यानंतर आता खाते वाटपातही उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचाच दबदबा दिसून आला आहे.

मंत्रिमंडळ खाते वाटपकरताना फडणवीस समर्थकांना चांगली खाती देण्यात आली आहेत. तर ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात घेऊन आधीच्या पेक्षा दुय्यम दर्जाची खाती देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांना यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण खातं देण्यात आलं आहे. त्यांना चांगलं खातं मिळेल अशी अपेक्षा होती. पण त्यांना अधिक महत्त्वाचं खातं देण्यात आलेलं नाही.

त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदावरून पाय उतार होताच चंद्रकांत पाटील यांचं पक्षातील वजन घटलं की काय अशी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे राज्याचं अर्थमंत्रीपद भूषविलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना वन खातं देण्यात आलं आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांचेही फडणवीस यांनी पंख छाटल्याचं बोललं जात आहे. फडणवीस यांच्या या धक्कातंत्रावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं होतं. त्यामुळे यावेळी त्यांना महसूल खाते दिले जाईल असं सांगितलं जात होतं. चंद्रकांतदादा माजी प्रदेशाध्यक्ष होते. चार दिवसांपूर्वीच त्यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावं लागलं. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना मोठी बक्षिसी मिळेल असे संकेत होते. पण पाटील यांना उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य हे खातं देण्यात आलं आहे.

तर युतीच्या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अर्थ आणि वन खाते होतं. त्यामुळे त्यांच्याकडे यावेळी महत्त्वाची जबाबदारी मिळणार अशी अपेक्षा होती. मात्र, मुनगंटीवार यांना वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय हे खातं देण्यात आलं आहे. मुनगंटीवार यांना दुय्यम दर्जाचं खातं देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.

या खातेवाटपात फडणवीस समर्थकांना चांगली खाती देण्यात आली आहेत. गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा आणि अतुल सावे या फडणवीस समर्थकांना चांगली खाती देण्यात आली आहेत.

See also  राज्याचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात

पक्षात आणि मंत्रिमंडळातही वरचष्मा
चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली. बावनकुळे हे कट्टर फडणवीस समर्थक मानले जातात. बावनकुळे यांची पक्षाच्या अध्यक्षपदी वर्णी लावून फडणवीस यांनी पक्षावर आपली पकड मजबूत केली आहे. तर, मंत्रिमंडळात आपल्या स्पर्धकांना दुय्यम दर्जाची खाती आणि समर्थकांना रेड कार्पेट अंथरून मंत्रिमंडळातही आपलाच वरचष्मा असल्याचं दाखवून दिलं आहे.