शेती आणि शेती उत्पादन प्रक्रिया उद्योग व्यवसायात रोजगारांच्या अनेक संधी : हर्षवर्धन पाटील

0

पुणे :

शेती आणि शेती उत्पादन प्रक्रिया उद्योग व्यवसायात रोजगारांच्या अनेक संधी आहेत. हे कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे प्रकर्षाने जाणवले. शेती उद्योगात उत्पादन, विपणन, प्रक्रिया, विक्री अशा अनेक विभागातून खुप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. सरकार, गुंतवणूकदार, शेती उत्पादक जमीनदार, कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घातल्यास शेती आणि शेतीपुरक व्यवसायातूनच भारत आणि महाराष्ट्र ‘ॲग्री हब’ म्हणून उदयास येईल. महाराष्ट्रात उत्तम हवामान आणि शेती योग्य जमीन आहे. परंतू शेतीकडे पाहण्याचा तरुणांचा दृष्टीकोन नकारात्मक आहे. यामध्ये बदल करुन शेतीला सिंचन, उच्च माहिती तंत्रज्ञान आणि संशोधनाची जोड दिल्यास भारत जागतिक महासत्ता होऊ शकतो असा विश्वास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पुणे बिझनेस स्कूल (पीबीएस) मध्ये ॲग्रीवाईज २०२२ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्‌घाटन प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड, कृषी व अर्थतज्ञ डॉ. परशराम पाटील, सह्याद्री फार्मचे आबासाहेब काळे, पीबीएस संचालक डॉ. गणेश राव आणि पीबीएसच्या अधिष्ठाता डॉ. मंजू पुनिया चोप्रा आदी उपस्थित होते.

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, शेती क्षेत्रामध्ये अधिक उत्पन्न आणि पैसा मिळवणे शक्य आहे. शेती क्षेत्रात पुरक संशोधन, कुशल मनुष्यबळाची कमतरता आणि शासकीय धोरणांच्या अंमलबजावणीचा अभाव आहे. पुढील काळात या क्षेत्रात आमुलाग्र आधुनिक बदल होणार आहेत. आधुनिक कृषी क्षेत्राकडे उद्योग, व्यवसाय अशा दृष्टीकोनातून पाहिले तर यातील संधी दृष्टीपथात येतात. महाराष्ट्र कृषी क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेच परंतू आणखी सक्षमता येण्यासाठी धोरणात बदल आवश्यक आहे. कोरोना काळात शेतकरी ते ग्राहक असा थेट संपर्क झाल्यामुळे शेतक-यांना फायदा झाला. यामध्ये नविन तंत्रज्ञानाचा भरपूर वापर झाला. केंद्र सरकारच्या कृषी क्षेत्र आणि छोट्या – मोठ्या शेतक-यांसाठी २० कोटी रुपयांपर्यतच्या अनेक अनुदान कर्ज योजना आहेत. त्यामुळे आर्थिक गुंतवणीची अडचण भासणार नाही. जर परदेशी कंपन्या येथे येऊन प्रक्रिया उद्योग, विपणन आणि वितरण व्यवस्था तयार करुन पैसा कमवितात तर आपल्याला ते का शक्य नाही. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि संशोधन उभारण्याचे काम पुणे बिझनेस स्कूल (पीबीएस) मधून करण्यात येईल.

See also  शाखाअध्यक्ष झाला म्हणजे तिकीट मिळालं असं नाही, जो चांगला काम करेल त्यालाच तिकिट : राज ठाकरे

साखर आयुक्त शेखर गायकवाड विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, साखर उत्पादनात भारत जगात दुस-या क्रमांकावर आहे. साखर क्षेत्राला आधुनिकतेची जोड दिल्यामुळे हे शक्य झाले आहे. बगॅस, इथेनॉल, सीबीजी (कॉंम्प्रेस बायो गॅस) याचा उपयोग इंधन म्हणून केला जातो. उत्तर भारतात आता लाखो ट्रॅक्टर सीबीजीवर चालविले जातात. त्यामुळे इंधनाची आयात कमी होत आहे. पर्यायाने परकी चलन वाचत आहे. आपल्या देशात शेती क्षेत्राला पुरक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास ईस्त्राईल प्रमाणे शेती करणे शक्य आहे. त्यामुळे पाणी, वीज, औषधे यांची बचत होऊन उत्पादनात वाढ होईल आणि वाढलेली शेती उत्पादने निर्यात करता येतील. पारंपरिक शेती करण्याऐवजी जगात ज्या उत्पादनांची गरज आणि मागणी आहे ती उत्पादने घेऊन निर्यात वाढवता येईल. वेगवान विकास आणि मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे शेती क्षेत्र आहे. शेतीबरोबरच शेती पुरक व्यवसायातून, बहु उत्पन्न शेतीतून गाय, म्हैस, शेळी यांच्या उत्पन्नातून शेतक-यांचा आर्थिक स्तर उंचावतो. शेतकरी आत्महत्येला हा पर्याय ठरु शकतो.