प्रभाग रचना आराखडा संबंधित अफवा पसरविणाऱ्यावर कारवाई साठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसची पोलिस ठाण्यात तक्रार…

0

पुणे :

महापालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा सोशल मिडीयावर दाखल करून अफवा पसरविणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई साठी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले कि,’ महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे आम्हाला माध्यमांमधून व पुणे महापालिकेच्या वर्तुळातून समजते, असे असताना काही राजकीय मंडळी जाणीवपूर्वक सदर प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करत असतात. किंबहुना त्यामध्ये अफवा पसरविण्याच्या प्रयत्न करत असतात. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात पुणे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. असे असताना सायंकाळपासून समाज माध्यमांमध्ये पुणे शहराची संभाव्य प्रभाग रचना म्हणून एक आराखडा व्हायरल होत आहे. अशा प्रकारच्या व्हायरल प्रभाग यादी रचनेचा आराखडा विविध ग्रुप व्हाट्सअप ग्रुप वर आम्हाला सुध्दा पाहायला मिळाला.

पुढे जगताप म्हणाले की, ही घटना महानगरपालिकेच्या अंतर्गत कामकाजाच्या गोपनीयतेचा भंग आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. म्हणूनच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन यामागे कुठली व्यक्ती अथवा संघटना आहे हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणून या संदर्भामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे पुणे सायबर पोलिसांकडे आम्ही आज सायंकाळी तक्रार दाखल केली असून हा नकाशा कुणाच्या माध्यमातून तयार करण्यात आला, तसेच हा नकाशा कोणी समाज माध्यमांवर व्हायरल केला यासंबंधी व्यक्ती व संघटना यांचा कसून शोध घ्यावा अशी मागणी आम्ही पुणे सायबर पोलिसांकडे केली आहे. पुणे सायबर पोलिस या गोष्टीचा सखोल तपास करतील व संबंधित आरोपी वर कारवाई करतील, असा आम्हाला विश्वास आहे.

See also  आयत्यावेळी प्रस्ताव आणून त्यावर जास्त चर्चा न घडू देता ते मंजूर करवून घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा महानगर पालिकेत धडाका सुरू