छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हरियाणातील पानीपतमध्ये स्थापन करण्यात येणार

0

पुणे :

छत्रपती शिवाजी महाराज यांचा हाती राजदंड घेतलेला पुतळा हरियाणातील पानीपतमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. रोड मराठा समाजाविषयीची नाळ, आपुलकी अधिक घट्ट व्हावे म्हणून भोर तालुक्यातील मावळ्यांनी शिवरायांचा पुतळा पानिपतमधील रोड मराठा बांधवांना दिला आहे. पानिपतमध्ये हा पुतळा स्थापन केला जाणार असल्याची माहिती भोरमधील नागरिकांनी दिली.

पानिपतच्या युद्धानंतर अनेक मराठी बांधव हरियाणातच स्थायिक झाले. या मराठी बांधवांना भोरमधील मावळ्यांनी हाती राजदंड घेतलेला शिवाजी महाराजांचा पुतळा भेट स्वरुपात दिला आहे. हरियाणातील मराठी बांधवांशी असलेलं नातं पिढ्यानपिढ्या असंच राहावं हा त्यामागील उद्देश आहे. शिल्पकार दीपक थोपटे यांनी ही सिंहासनावर आरुढ आणि हाती राजदंड घेतलेली शिवाजी महाराजांची मूर्ती साकारली आहे. यासाठी भोरमधील मराठ्यांसह इतर समाजातील अनेक दानशूर व्यक्ती पुढे आल्या. त्यासह शिवकार्यासाठी तळमळीने अविरत कार्य करणारे शेकडो शिवभक्तांनी यासाठी मदत देऊ केलीय.

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं भोर मध्ये पूजन करण्यात आलं. त्यानंतर महाराजांचा पुतळा पानिपतच्या दिशेने रवाना करण्यात आला आहे. 26 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पानिपतमध्ये महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे.

पानिपतची कहाणी काय होती?

पानिपतचं युद्ध हे एक निर्णायक युद्ध होतं. या युद्धात आप्तस्वकीयांनी अब्दालीला साथ दिली. त्यामुळे मराठ्यांचा या युद्धात पराभव झाला. या पराभवामुळे देशाचं मोठं नुकसान झालं. या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. पण हिंदुस्थानावर राज्य कोम करेल हे अजूनही ठरलं नव्हतं, असं इतिहास संशोधकांचं म्हणणं आहे. त्याकाळात इंग्रजांचीही ताकद वाढलेली होती. ते देशभर पसरले होते. मोगलांचं साम्राज्य लयाला जाण्याचा हा काळ होता. देशात मराठ्यांची ताकद मोठी होती. त्यामुळे मोगल गेल्यानंतर देशावर मराठ्यांचंच राज्य येईल हे निश्चित होतं. मात्र पानिपताच्या पराभववामुळे मराठ्यांची ताकद क्षीण झाली. तर दुसरीकडे इंग्रजांनी उचल खाल्ली होती. अब्दालीने पानिपतनंतर लुटमार आणि रक्तपात घडवून आणला. त्यानंतर तो अफगाणिस्तानला गेला. आणि हिंदुस्थान इंग्रजांचा गुलाम झाला, असं इतिहासकार सांगतात.

See also  पुणे- बंगळूर महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचा पगार मिळेना म्हणून संप.

रोड मराठा समाजाची कल्पना आहे तरी काय?

1761 मध्ये पानिपतचं युद्ध हे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठं आणि महत्वाचं युद्ध मानलं जातं. या युद्धाचं नेतृत्व सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी केलं होतं. अफगाणिस्तानातून आलेल्या अहमदशाह अब्दालीकडून पेशवांच्या पराभव झाला. रोहिले आणि अफगाण्यांविरोधात सदाशिवराव भाऊ यांच्यासोबत नेटाने लढलेले कित्येक मराठा शूर सैनिक धारातीर्थी पडले.

युद्धात सहभागी झालेले अनेक मराठा कुटुंब पराभवानंतर मायभूमीला परतले. तर जवळपास तिनशे कुटुंब ही पानीपतमध्येच वास्तव्याला राहिली आणि पुढे तिथेच स्थायिक झाली. युद्ध भूमीच्या आजूबाजूला सुरक्षित ठिकाणी त्यांनी आश्रय घेतला आणि पुढे तिथेच राहू लागले.

स्थानिकांपासून धोका होऊ नये म्हणून त्यांनी आपली ओळख काही काळ लपवली. आम्ही एक राजा रोडच्या समाजाचे असल्याचं हे मराठा कुटुंबे सांगू लागली. तर अनेकांनी तिथल्या स्थानिकांची नावं लावण्यास सुरुवात केली. पानिपत, सोनिपत, करनाल, रोहतक या जिल्ह्यात रोड समाजाची संख्या मोठी आहे. मुळचा मराठी पण सध्या पानिपतमध्ये स्थायिक असलेला हा समाज रोड मराठा समाज म्हणून ओळखला जातो.