उरवडे दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल

0

उरवडे :

मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ असलेल्या रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्याचं सांगत एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर या दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी, मृतांच्या नातेवाईकाचं सांत्वन केलं. गृहमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर काही वेळातच कंपनीच्या मालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. काही वेळातच कंपनीचा मालक निकुंज शहा याला अटक करण्यात आली आहे.

मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आग कशामुळे लागली, याला जबाबदार कोण यासाठीच्या चौकशीसाठी शासनाने समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त होईल. चौकशीचा प्राथमिक अहवाल प्राप्त होताच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल, व आगीच्या चौकशी अहवालानंतर जबाबदारी निश्चित होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली

खासदार सुप्रिया सुळे यांनीही रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

या आगीत मृत्यू झालेल्याची नावे..
मंदा भाऊसाहेब कुलट (वय 45), संगीता उल्हास गोंदे (वय 36), गीता भारत दिवारकर (वय 38), त्रिशला संभाजी जाधव (वय 33, सर्व रा. उरवडे, ता. मुळशी), सुरेखा मनोहर तुपे (वय 45, रा. करमोळी, ता. मुळशी), सुनिता राहुल साठे (वय 28, रा. भालगुडी, ता. मुळशी), अतुल लक्ष्मण साठे (वय 23, रा. भालगुडी, ता. मुळशी), सारिका चंद्रकांत कुदळे (वय 38, रा. पवळे आळी, पिरंगुट, ता. मुळशी), धनश्री राजाराम शेलार (वय 22) संगीता अप्पा पोळेकर (वय 42), महादेवी संजय आंबारे (वय 35, सर्व रा. पिरगुंट कॅम्प, ता. मुळशी), अर्चना व्यंकट कवडे (33), शीतल खोपकर, मंगल बबन मरगळे, सुमन संजय ढेबे, सीमा सचिन बोराडे (वय 30), सचिन मदन घोडके (वय 25) यांचा मृत्यू झाला.

See also  लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी सोबतच लोकाभिमुख कारभार व्हावा : अजित पवार

ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी

भीषण आगीत Fire मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने (ब्लड सॅम्पल) घेण्यात येतील. डीएनए चाचणी तसेच रक्तांच्या नमुन्याद्वारे मृतांची ओळख पटविण्यात येणार असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. मृतांची लवकरात लवकर ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. पुण्यातील पाषाण रस्त्यावर असलेल्या न्यायवैद्याकीय प्रयोगशाळेसह नाशिक, औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत डीएनए चाचणी करण्यासाठी नमुने पाठविण्यात येणार आहेत.