म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारांचा समावेश शहरी गरीब योजनेत : महापौर

0

पुणे :

कोरोनातून बरे झाल्यानंतर आता म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आढळत आहेत. त्यावरील उपचार महागडे आहेत. यावर उपचार घेणे, सर्व सामान्य रुग्णाला परवडत नाही. त्या पार्श्वभूमीवर, आता पुणे शहरात म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारांचा समावेश शहरी गरीब योजनेत करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहरी गरीब योजनेतून आतापर्यंत १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य संबधित रुग्णांच्या बिलावर दिले जात होते. मात्र आता म्युकरमायकोसिस या नव्या आजाराचा यात समावेश करुन त्याच्या उपचारांसाठी ही मर्यादा १ लाखांवरुन ३ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी १८ मे ला दिली आहे.

म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णांसंख्येचा विचार करता महापौर मोहोळ यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमवेत महत्वाची बैठक घेऊन उपचारांसंदर्भात निर्णय घेतल्याची माहिती मिळते. मुरलीधर मोहोळ याबाबत बोलताना पुढे म्हणाले की, ‘पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर येथील दळवी रूग्णालयात १५ बेड हे म्युकरमायकोसिसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना राखीव ठेवण्यात आले आहे’. तसेच, ‘म्युकरमायकोसिस आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास आपल्या जवळील रूग्णालयात तातडीने उपचार घ्यावेत’, असे आवाहनही मोहोळ यांनी केले आहे.

नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी !

महापौर मोहोळ म्हणाले की, ‘पुणे महानगरपालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून येथील ऑपरेशन थिएटर अद्ययावत आणि सज्ज ठेवण्यात येत आहेत. शिवाय उपचार करताना या आजारासंबंधी तज्ञ डॉक्टरांची नेमणूकही तातडीने केली जात आहे. कोरोनावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर नागरिकांनी म्युकरमायकोसिस बाबतीत अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. लवकर निदान झाले तर योग्य उपचार करणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी’, असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले आहे.

See also  असंख्य प्रकारच्या भाषा शिकलो तर आपला आयुष्य समृद्ध होईल : ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे