गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाकडून मोहीम; मनमानी प्रवास भाडे आकारणीबाबत तक्रार नोंदविण्याचे आवाहन

0

पुणे :

गणेशोत्सव आणि आगामी सर्व सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट होऊ नये यासाठी परिवहन विभागाने मोहीम सुरू केली आहे. मनमानी पद्धतीने भाडे आकारणी करणाऱ्यांवर परिवहन विभागाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी प्रवाशांनी तक्रार नोंदविण्याचे आवाहन देखील विभागाकडून करण्यात आले आहे.

खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांकडून प्रति कि.मी. भाडे दराच्या 50 टक्के पेक्षा अधिक किंवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या भाडेदराच्या दीडपटीपेक्षा अधिक भाडेदर आकारणी केली गेल्यास rtopune@gmail.com या ई-मेलवर किंवा 8275330101 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले आहे

खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांना जादा भाडे आकारण्याच्या प्रवृतीला आळा घालण्यासाठी व रस्ता सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने 30 सप्टेंबरपर्यंत तपासणी व मनमानी भाडे आकारणीबाबत मोहीम राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या टप्पा वाहतूकीचे भाडेदर विचारात घेवून खासगी बसचे त्या संवर्गासाठीचे कमाल भाडे परिवहन महामंडळाच्या बसेसच्या भाडेदराच्या दीडपटीपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर शासनाने 27 एप्रिल 2018 रोजी शासन निर्णय जारी करून निश्चित केले आहेत.

शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स, बसेस यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. खासगी बस मालक चालक यांनी नियमानुसार प्रवासी तिकीटदराची आकारणी करावी, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी सांगितले आहे.

See also  पीएमआरडीएच्या अधिकारक्षेत्रासाठी आकाशचिन्ह धोरण (होर्डिंग पॅालिसी ) प्रशिद्ध ...