चित्रपटगृहांमध्ये सिनेमे पाहण्याचा आनंद वेगळा असतो : आमिर खान

0

पुणे :

ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसीरिज किंवा सिनेमे पाहण्याचा वेगळा अनुभव आहे, तर चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांसोबत सिनेमे पाहण्याचा आनंद वेगळा असतो. त्याची तुलना होऊ शकत नाही. आगामी काळात चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर, प्रेक्षकांना चित्रपटाचा मोठ्या पडद्यावर पुन्हा आनंद घेता येईल,’ असे मत अभिनेता अमिर खान याने शनिवारी व्यक्त केले.

सिम्बायोसिस संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सुवर्णमहोत्सवी व्याख्यानमालेत ऑलनाइन पद्धतीने आमिरने संवाद साधला. या वेळी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, उपकुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर, ‘एसआयएमसी’च्या संचालिका डॉ. रुची खेर जग्गी आदी सहभागी झाले होते.

आमिर म्हणाला, ‘सिनेमासृष्टीत नाविन्याला महत्त्व आले आहे. सध्या वैविध्यपूर्ण कथांवर आधारित चित्रपटांची निर्मिती होत आहे, ही चांगली बाब आहे. काही वर्षांपूर्वी असे नव्हते.’ चित्रपट पाहताना लोकांना आनंद मिळाला पाहिजे आणि त्याच वेळी व्यावसायिकदृष्ट्या चित्रपट यशस्वी कसा होईल, या दोन प्रमुख गोष्टींवर विचार करून चित्रपट निवडत असल्याचे आमिरने स्पष्ट केले.

‘सोशल मीडियावर कमी सक्रिय असलो, तरी लोक ‘फॉलो’ करतात, हे ऐकून बरे वाटले. लोकांनी मला पाहण्यापेक्षा, त्यांनी माझ्या कामातून अनुभव घेतला पाहिजे. माझ्या कामाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधायला अधिक आवडेल,’ असेही आमिरने स्पष्ट केले.

See also  राधे चित्रपट प्रदर्शनाबाबत सलमान खानची ट्विट वर घोषणा