हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेलचा विजय..

0

पुणे :

हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला.

जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रदीप कंद आणि विकास दांगट यांच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने १३-२ असा विजय मिळवला आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली बाजार समितीचा हा निकाल अजित पवार यांच्यासाठी धक्कादायक मानला जात आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बंडखोरी भोवली. बाजार समितीच्या राजकारणात भारतीय जनता पक्षासह ठाकरे गटाने प्रवेश केला. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष करुन गुलालाची उधळण केली.

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात उरतले होते. त्यापैकी १५ जागांवर आमने-सामने लढत झाली. २ जागा व्यापारी आणि आडते मतदार संघातून व १ जागा हमाल-मापाडी मतदार संघातून निवडून आली आहे. तब्बल २० वर्षांनंतर ही निवडणूक झाली. तसेच, राष्ट्रवादीतून विकास दांगट यांनी बंडखोरी केली. त्यांच्यावर पक्षाने हकालपट्टीची कारवाई केली. त्यामुळे या निवडणुकीत प्रचंड चूरस निर्माण झाली होती. तसेच, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे खंदे समर्थक आणि महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. दुसरे उमेदवार तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांचाही पराभव राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर पॅनल आणि अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी यामध्ये लढत झाली. ७२.२९ टक्के इतके मतदान झाले होता. स्वारगेट येथील शिवशंकर सभागृह येथे मतमोजणी करण्यात आली. सेवा सहकारी संस्था गटातील ११ जागा, ग्रामपंचायात गटात ४, व्यापारी व आडते गटात २ आणि हमाल, मापाडी गटातील १ जागेसाठी उमेदवार निवडणूक लढले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारात उडी घेतली होती. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील सेवा सहकारी मतदार संघातील सुमारे १३१ मतदारांनी राष्ट्रवादीला नाकारल्याचे दिसून येत आहे. भाजपा पुरस्कृत पॅनलसाठी आमदार महेश लांडगे यांनी भाजपा पुरस्कृत उमेदवारांच्या विजयासाठी सक्रीय पुढाकार घेतला. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सेवा सहकारी संस्था मतदार संघामध्ये अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचा दबदबा कायम राहिला. भाजप पुरस्कृत उमेदवारांचा बाणेर, बालेवाडी पाषाण येथील माजी नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, आणि भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष राहूल कोकाटे यांनी देखील प्रचार केला.

See also  खोदकामात सापडलेली सोन्याची नाणी विकणाऱ्याला अटक.

राहुल काळभोर यांच्याबरोबरच या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी संचालक प्रकाश म्हस्के यांचे बंधु शेखर सहदेव म्हस्के, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष आबासाहेब कांचन, अशोक सुदाम गायकवाड, योगेश बाळासाहेब शितोळे, दत्तात्रय दिनकर चोरघे, कुलदीप गुलाबराव चरवड, संदीप माणिकराव गोते, प्रतिभा महादेव कांचन, सरला बाबुराव चांदेरे या राष्ट्रवादीच्या दिग्गज उमेदवारांना या निवडणुकीत पराभवाला सामोरी जावे लागले

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :

सोसायटी मतदार संघातील “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” चे विजयी उमेदवार- रोहिदास दामोदर उंद्रे, दिलीप काशिनाथ काळभोर, प्रशांत दत्तात्रय काळभोर, राजाराम आबुराव कांचन, प्रकाश चंद्रकांत जगताप, नितीन पंढरीनाथ दांगट, दत्तात्रय लक्ष्मण पायगुडे, शशिकांत वामन गायकवाड व लक्ष्मण साधू केसकर

महिला विजयी उमेदवार- मनिषा प्रकाश हरपळे, सारिका मिलिंद हरगुडे

ग्रामपंचायत गट- सुदर्शन जयप्रकाश चौधरी, रवींद्र नारायणराव कंद.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे – रामकृष्ण हेमचंद्र सातव, आबासाहेब कोंडीबा आबनावे (ग्रामपंचायत गट)

व्यापारी मतदार संघ- गणेश सोपान घुले व अनिरुध्द शिवलाल भोसले.

हमाल-मापाडी मतदार संघ- संतोष नांगरे